| रसायनी | प्रतिनिधी |
पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीवर रसायनी पोलिसांनी कारवाई केली आहे. चांभार्ली येथे दोन अनोळखी व्यक्तींनी बुधवारी (दि.10) ‘साहेब आम्ही पोलीस आहोत’ असे सांगून एका व्यक्तीची टाटा टियागो कार लंपास केली होती. त्यानंतर त्यांनी कारची नंबर प्लेट बदलून ती फसवणुकीसाठी वापरली. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा मागोवा घेतला असता, अजिंक्य उर्फ अभिजीत अनंत शिंदे (35)याला अटक करण्यात आली. त्याच्यावर पूर्वीही खून, जबरी चोरी, चोरी असे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचा साथीदार इकबाल अब्दुलकादीर शहा हा सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या कारवाईत रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.विशाल नेहूल व पोलीस निरीक्षक संजय बांगर यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
गाडी चोरणारा तोतया पोलीस गजाआड
