फक्त डिगऱ्या घेऊन करिअर घडत नसते

स्पर्धा परीक्षेबाबत ज्ञान अत्यावश्यक

| म्हसळा | वार्ताहर |

ग्रामीण भागातून उच्च श्रेणीय अधिकारी तयार झाले पाहिजेत. फक्त डिगऱ्या जमवून करिअर घडणार नाही, तर यूपीएससी, एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षा देऊन आपला जीवनाचा उद्देश साध्य करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सेवानिवृत्त न्यायाधीश डॉ. जलाल पठाण यांनी केले. म्हसळा येथील कोकण उन्नती मित्र मंडळ संचलित वसंतराव नाईक कला, वाणिज्य आणि बॅ. ए.आर. अंतुले विज्ञान महाविद्यालय म्हसळा आणि अंजुमन हायस्कूल व जुनिअर कॉलेज म्हसळा यांच्या विद्यमाने विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन व प्रोत्साहनपर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन व्ही. एन.सी. महाविद्यालय आणी घनसार कॉप्लेक्स म्हसळा येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

कोकण उन्नती मित्र मंडळाचे अध्यक्ष मुशताक अंतुले, सचिव अशोक तळवटकर, खजिनदार वंदना विचारे, स्थानिक विकास व्यवस्थापन समितीचे संस्था प्रतिनिधी फझल हलडे आणी सर्व कमिटी सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना कायद्याच्या दृष्टीकोनातून विद्यार्थी जीवनात आपल्याला ज्ञान असणे किती आवश्यक आहे, हे न्या. पठाण यांनी पटवून दिले. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपले करिअर करण्याकडे जास्तीत जास्त भर दिले पाहिजे आणि शासनाच्या माध्यमातून ज्या काही स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्यामध्ये भाग घेणे अत्यावश्यक असून, म्हसळासारख्या महाविद्यालयात स्पर्धा परीक्षेबाबत ज्ञान मिळणे गरजेचे आहे. स्पर्धा परीक्षांना सामोरे गेले पाहिजे आणि त्यातून खचून न जाता यश प्राप्त करण्यासाठी मेहनत घेतली गेली पाहिजे. भविष्यात या महाविद्यालयात अश्या प्रकारचे शिक्षण उपलब्ध व्हावे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

नाझीमभाई चौगले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास ॲड. शेख, भाई दफेदार, अंजुमन चेअरमन नासिर मिठागरे, अब्दुल शकुर घनसार, नाझीम डावरे, महंमद तांबे, मुबशीर जमादार, अंजुमन हायस्कूलचे प्राचार्य अ. रहमान घराडे, सैफुल्ल जमादार, खालिद सिद्दीकी, नवाज नजीर, शहानवाज उकये, मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य दिगंबरटेकळे यांनी केले आणि प्रा. भोसले यांनी सूत्रसंचालन केले, तसेच प्रा. सिद्दीकी यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

विद्यार्थ्यांना कायदेविषयक ज्ञान असणे गरजेचे आहे. मूल पोटात असल्यापासून त्याच्या मागे कायदा सुरु होतो. त्यासाठी भविष्यात म्हसळा येथे कायदेविषयक शिक्षणाची दालने सुरु करून त्यामधून न्यायाधीश तयार व्हावेत.

न्या. जलाल पठाण
Exit mobile version