कार्ले गावात लागोपाठ दोन गोळ्या घुसल्या; वृध्द महिला बालंबाल बचावल्या

आतापर्यंत दोन वर्षात घरात शिरल्या 6 गोळ्या; गोळीबार सराव बंद करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील परहूर पाडा येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रावर सुरू असलेल्या सरावादरम्यान बंदुकीतून सुटलेल्या दोन गोळी लागोपाठ थेट मंगेश शंकर नाईक, उदय बाबू पाटील यांच्या घरात घुसली. ही घटना गुरुवारी (दि.27) दुपारी 1 च्या सुमारास घडली. सातत्याने अशा थरारक घटना घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची पोलीस प्रशासनाने तातडीने गांभीर्याने दखल घेत सदर गोळीबार सराव बंद करण्याची मागणी करण्यासाठी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आ. जयंत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे सरावाचे मैदान व गावाच्या मध्ये संरक्षक भिंत उभी करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र भिंत असतानाही गोळ्या घरात येत असल्याने ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.


या गावामध्ये सुमारे सव्वादोनशे घरे आहेत. गुरुवारी दुपारी एक वाजता पोलिसांचा गोळीबार करण्याचा सराव सुरू असताना बंदुकीतून झाडलेल्या गोळ्या कार्ले गावातील मंगेश शंकर नाईक यांच्या घराच्या छपरावरील पत्र्यातून घरात घुसली. त्याचवेळी गावातील उदय बाबू पाटील यांच्या ओटीवर देखील पत्रा फोडून भिंतीवर गोळी आदळली. यावेळी वत्सला बाबू पाटील वय 72 या बसल्या होत्या. त्यांच्या डोक्या जवळून गोळी भिंतीवर आदळून अंगणात पडली. सुदैवाने त्या बसल्या असल्याने गोळी त्यांच्या शरीरावर लागली नाही. अन्यथा जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गावामध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. घरात गोळी घुसल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी तातडीने पोलिसांत कळविले. पोलीस घटनास्थळी येऊन पाहणी करतील, असे ग्रामस्थांना सांगण्यात आले. मान तर्फे झिराडचे माजी सरपंच जयेश पाटील, उपसरपंच राकेश पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत मानवी वस्तीत गोळ्या घुसत असतील तर गोळीबार सराव सुरू ठेवू देणार नाही असा पवित्रा ग्रामस्थंच्यावतीने घेण्यात आला आहे. यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Exit mobile version