म्हसळ्यात गोहत्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

पोलिसांच्या कारवाईने परिसरात खळबळ

| म्हसळा | प्रतिनिधी |

म्हसळा तालुक्यात गोवंश चोरी व कत्तल प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने धडक कारवाई करत दोन संशयितांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील तपास सुरू आहे. दि. 26 फेब्रुवारी रोजी म्हसळा पोलीस ठाण्यात गोहत्यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली. सुरई (ता. म्हसळा) येथील रहिवासी परशुराम धोंडू जाधव यांच्या दोन बैलांची चोरी झाल्याची माहिती समोर आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी नवानगर, म्हसळा येथे छापा टाकला असता चोरीस गेलेले बैल कत्तलीच्या उद्देशाने आणल्याचे आढळून आले. या कारवाईदरम्यान आरोपी आफताफ हुरजूक व त्याचा साथीदार इमरान काझी (रा. नवानगर) यांच्या राहत्या घरी एक बैल बांधलेल्या अवस्थेत जिवंत आढळला, तर दुसऱ्या बैलाची कत्तल झाल्याचे पोलिसांनी सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पारखे यांनी पथकासह ही कारवाई करून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रवींद्र पारखे व तपासी अंमलदार एस.पी. रोहिणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणामागे मोठी टोळी कार्यरत असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात असून, संबंधित साखळीचा तपास केला जात आहे.

कॅटरिंग व्यवसायाशी संबंधित बाबींचीही चौकशी
कारवाईदरम्यान संबंधितांपैकी एक जण कॅटरिंग व्यवसाय चालवत असल्याचे समोर आले असून, त्याच्या डीप फ्रीजरमध्ये मोठ्या प्रमाणात मांस सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यासंदर्भात नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे समजते. संबंधित मांसाचा प्रकार आणि त्याचा प्रकरणाशी संबंध आहे का, याबाबत अधिकृत अहवालानंतरच स्पष्टता येणार आहे. या घटनेनंतर तालुक्यात चर्चा सुरू असून, प्रशासनाने नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन केले आहे.
Exit mobile version