आदित्य ठाकरेंसह सचिन अहिर, सुनील शिंदेवर गुन्हा दाखल

| मुंबई | प्रतिनिधी |
डिलाईल रोड उड्डाणपुलाचे बेकायदेशीररित्या उद्घाटन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यासह सचिन अहिर आणि सुनील शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईकरांसाठी लढतोय म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. उद्घाटनासाठी वेळ नसल्यामुळे डिलाईरोडचा पुल बंद ठेवण्यात आला होता. मुंबईकरांसाठी लढत असताना गुन्हा दाखल होत असेल, तर माझ्या आजोबांना अभिमान वाटत असेल. बेकायदेशीर बांधकामे करणाऱ्या बिल्डरवर गुन्हे दाखल होत नाहीत. वेळेत काम पूर्ण न केलेल्यांवर गुन्हे दाखल करा. भ्रष्टाचार आम्ही समोर आणले. पालकमंत्र्यांचा राजीनामा घ्या. स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा आम्ही समोर आणल्यानंतरही 22 कोटींचे कॉन्ट्रॅक्ट देण्याचा घाट घातला. मुख्यमंत्र्यांचे काहीच दिवस राहिले आहेत त्यामुळे राज्यपालांनी लक्ष घालावे, असे ठाकरे म्हणाले.

नवी मुंबई मेट्रोचे काम पूर्ण होऊन पाच महिने झाले होते, तरी ती सुरु करण्यात आली नव्हीती. सरकारी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसचा प्रश्न उपस्थित केल्यावर बोनस दिला गेला. मुख्यमंत्र्यांना समज द्यावी अशी राज्यपालांना पत्राद्वारे मागणी केली आहे. मुख्यमंत्री आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी रस्ते ब्लॉक केले जातात. एकीकडे भाजप सांगते व्हीआयपी कल्चर नको आणि दुसरीकडे रस्ते बंद करतात. आम्हाला जर म्हणत असतील की आम्ही पूल सुरू केल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला. मग समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले. त्यानंतर जे अपघात झाले, लोकांचा मृत्यू झाला मग आता गुन्हा कोणावर दाखल करायचा, असा सवाल ठाकरे यांनी केला आहे.

Exit mobile version