| पनवेल | वार्ताहर |
आराम करण्यासाठी गाडीमध्ये झोपलेले असताना अज्ञात इसमाने गाडीचा दरवाजा उघडून पाच मोबाईल फोन व रोख रक्कम चोरून नेल्याचा प्रकार कामोठे येथे घडला आहे.
दादर ईस्ट, मुंबई येथील अनिकेत भिंगार्डे हे ऍक्सिस बँक लोन सेंटरमध्ये सीनियर रिलेशनशिप ऑफिसर आहेत. जितेंद्र कुमार कटारिया, किशोर रवळे, पांडे हे वॅगनार गाडी घेऊन लोनच्या कामासाठी पुण्याला गेले होते. काम संपल्यानंतर रात्री मुंबई येथे येण्यासाठी गाडीने निघाले. अनिकेत गाडी चालवत होता व तिन्ही ऑफिसर गाडीत बसले होते. यावेळी थोडा वेळ आराम करू या, असे त्यांच्यात बोलणे झाले.
रात्री साडेतीन वाजता पुणे-मुंबई लेनवर सीएनजी पंपाच्या समोर स्काय वॉकच्या खाली कामोठे येथे आले असता, गाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली व काही वेळ आराम करण्यासाठी सर्वजण गाडीमध्ये झोपले. यावेळी मोबाईल गाडीच्या चार्जिंग पॉइंटला लावले होते. साधारण पावणे पाच वाजता अनिकेतला जाग आली. त्याला पाच मोबाईल दिसून आले नाहीत. तसेच अनिकेत यांच्या पॅन्टचा उजवा खिसा कापला असल्याचे लक्षात आले. त्यांच्या खिशातून 13 हजार 200 रक्कम चोरून नेण्यात आली व 46 हजार 200 रुपयांचे पाच मोबाईलदेखील चोरून नेण्यात आले.