नागेश्वराचे दर्शन घेण्यासाठी होणार अलोट गर्दी
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील आवास येथील यात्रा गुरुवारी (दि. 14) भरणार आहे. उद्या पहाटेपासून भाविक जागृत देवस्थान नागेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करणार आहेत. भाविकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी अलिबाग एसटी बस आगारातून ज्यादा बसेस सोडण्यात येणार असल्याच माहिती आगार व्यवस्थापक राकेश देवरे यांनी दिली.
आवासमधील नागेश्वर मंदिर भाविकांचे श्रध्दास्थान आहे. यात्रेच्या दिवशी वेगवेगळया भागातून जिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी येतात. खाद्य पदार्थांसह वेगवेगळ्या वस्तू व पुजेच्या साहित्यांची दुकाने या ठिकाणी थाटली जातात. त्यामुळे या परिसरात जत्रेचे स्वरूप निर्माण होते. यावर्षी आवासमधील यात्रा 14 नोव्हेंबर रोजी आहे. यात्रेनिमित्त बैलगाडीने जाऊन नागेश्वराचे दर्शन घेण्याची परंपरा आजही अबाधित आहे. भाविकांचा प्रवास सुखकर व आरामदायी व्हावा यासाठी अलिबाग एसटी बस आगार सज्ज झाला आहे. अलिबाग आगारातून आवासला जाणार्या भाविकांसाठी 14 ज्यादा बसटी बसचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती देवरे यांनी दिली.