भरत गोगावले यांच्याविरोधात निवडणूक अधिकार्यांकडे तक्रार
। अलिबाग । प्रतिनिधी ।
महाड विधानसभा मतदारसंघातील शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी मते मिळविण्यासाठी अंधश्रद्धेचा वापर केल्याचा आरोप पिंपळवाडी येथील बाबू पांगारे यांनी केला आहे. गोगावले यांच्याविरोधात मतदान केल्यास शारीरिक अवयव दगावण्याची धमकी देण्यात आली असल्याचे पांगारे यांनी सांगितले.
निवडणुकीच्या प्रचाराला अवघे पाच दिवसच शिल्लक राहिले आहे. राजकीय वातावरण तापू लागले आहे. सभा, बैठकांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाडमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार स्नेहल जगताप निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिंदे गटातील महायुतीचे उमेदवार भरत गोगावले यांच्याविरोधात त्यांची लढत होणार आहेत. जगताप या उच्च शिक्षित महिला उमेदवार असल्याने प्रचारादरम्यान त्यांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मतदारांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे गोगावलेंना त्याचा पराजय दिसू लागला आहे. त्यामुळे महाडमधील ग्रामीण भागातील जनतेला घाबरविण्याचा प्रयत्न गोगावले यांच्याकडून केला जात असल्याची चर्चा सुरु आहे.
पिंपळवाडी गावामध्ये रविवारी (दि. 10) भरत गोगावले यांच्या प्रचारार्थ गाव बैठक आणि प्रचारसभा घेण्यात आली. या सभेमध्ये गोगावलेंचे धाकटे बंधू चंद्रकांत गोगावले यांनी भरत गोगावले यांच्या सांगण्यावरून प्रचारसभेत मतदारांच्या मनात अंधश्रद्धा भेडसावण्याचा प्रयत्न केला. गोगावले यांच्याविरोधात मतदान केल्यास गावबहिरीला नवस करून शारीरिक अवयव दगावण्याची धमकी त्यांनी दिली. भरत गोगावले यांच्याविरोधात बुथ लावण्यात आल्यास जीवे ठार मारण्याची धमकीदेखील दिल्याचा आरोप पांगारे यांनी केला. ही बाब लोकशाहीविरोधी असून, संबंधितांविरोधात कारवाई करून आम्हाला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी व तक्रार अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे केला आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.