पालीत मोकाट गुरे, श्‍वानांना उकिरड्याचा आधार

| सुधागड | पाली |
पाली शहरात कचरा व्यवस्थापनाचे बारा वाजले असून कचरा कुंड्यावर मोकाट गुरे व कुत्रे यांचे अधिराज्य आहे. अयोग्य कचरा व्यवस्थापनामुळे पालीकर हैराण असून, मोकाट गुरे व कुत्रे यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उकिरड्यावरील व कचरा कुंडीतील कचरा खाण्यासाठी मोकाट गुरे तसेच भटके कुत्रे येथे येतात. कचर्‍याची समस्या गंभीर होऊन स्वच्छतेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. येथील कुंभारआळी, बाजारपेठ, मधली आळी, जूने पोलीस स्टेशन या परिसरात कचरा कुंड्यांवर सकाळ पासूनच मुकाट गुरांची गर्दी असते. येथे टाकलेला ओला कचरा ही गुरे व कुत्रे अस्ताव्यस्त करतात त्यामुळे येथे घाण व दुर्गंधी पसरते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात आले आहे.

बर्‍याचवेळा टाकून दिलेले अन्न पदार्थ पिशव्यांमध्ये असते. परिणामी गुरांच्या पोटात कमी-अधिक प्रमाणात प्लास्टिक जाते. प्लास्टिक व सडके आणि कुजलेले अन्न पदार्थ खाऊन या जनावरांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात. त्यांची पचनशक्ती मंदावते, अन्नाच्या शोधात सतत चालल्याने त्यांची ऊर्जा कमी होते. अशक्तपणा येतो. कचराकुंड्यामध्ये व उकिरड्यावरील कचर्‍यात धातू तसेच अणुकूचिदार वस्तू उदा. घरगुती वापराची सुई, काच आदी घटक असतात. त्या पोटात गेल्यामुळे जनावरांच्या जठराला व अन्ननलिकेला इजा पोहचते. सतत प्लास्टिक खाल्ल्यामुळे ते त्यांच्या पोटात साठते त्यामुळे गुरांचा मृत्यू होतो. काही वेळेस अशा मेलेल्या गुरांची हाडे इतर गुरे आणि प्राणी चघळतात व पर्यायाने त्यामुळे त्यांचा देखिल मृत्यू होतो. आणि हे दुष्टचक्र असेच सुरू राहते. शेतकरी किंवा गोपाळक आपली गुरे चरण्यासाठी मोकाट सोडून देत असल्याने मोकाट गुरांचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे.

नागरिकांनी कचराकुंड्यांमध्ये कचरा न टाकता घंटागाडीतच टाकावा. जेणेकरून गुरे तेथे येणार नाहीत.

– आरिफ मणियार, उपनगराध्यक्ष,

ओला कचरा, सुका कचरा विलिगीकरणाबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. ओल्या कच-याचे खत तयार करता येईल तसेच सुका कचर्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे सोपे होईल.

– दत्तात्रय दळवी – स्वयंपूर्ण सुधागड


जनावरे मोकाट सोडू नका
पशुपालकांनी आपली जनावरे मोकाट सोडू नये. उकिरड्यावर टाकलेले अन्न पदार्थ खाऊन गुरांची पचनक्रिया बिघडते. वारंवार प्लास्टिक पोटात गेल्याने ते पोटात साठून गुरांचा मृत्यू देखील होऊ शकतात,असे तालुका पशुधन अधिकारी डॉ. प्रशांत कोकरे यांनी सांगीतले.

Exit mobile version