| सुतारवाडी | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील दुरटोली फाट्यावरील रस्त्यावर गुरांची मोठी फौज दररोज सकाळी अस्त व्यवस्थ उभी असते. त्यामुळे, कोलाड येथून सुतारवाडीमार्गे पुणेकडे जाणाऱ्या आणि पुणेकडून रोहाकडे येणाऱ्या लहान मोठ्या तसेच अवजड वाहनांना मोठा अडथळा येत आहे. रात्री जर ही गुरे अशीच रस्त्यावर राहिली तर अवजड किंवा अन्य वाहनांची त्यांना धडक लागून ती जखमी किंवा मृत्यू पावतात. अशा घटना यापूर्वी कोलाड ते विळा या मार्गावर घडल्या आहेत. यामध्ये गुरं दगावली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. शेतकऱ्यांनी आपली गुरे मोकाट न सोडता त्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.