| पाताळगंगा | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील निगडोली गावात राहणारे शेतकरी दीपक फरात यांच्या गोठ्यात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत गोठा पूर्णपणे जळून खाक झाला आहे. या आगीतून गाईला वाचविण्यात यश आले आहे. मात्र, गोठ्याचे आणि आजूबाजूच्या परिसराचे आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
एप्रिल महिन्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने अंगाची लाही लाही होत आहे. या उन्हाच्या तडाख्यात आग लागण्याच्या प्रमाणातही वाढ होत असून, निगडोली गावाबाहेर दीपक फराट यांच्या असलेल्या गुरांच्या गोठ्याला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. उन्हाच्या कडाक्यात आगीने अधिकच पेट घेतल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर आग लागल्याचे समजतात गोठ्या शेजारी असणाऱ्या एका फार्म हाऊसमधील कामगाराने धाव घेत गुरांच्या गोठ्याची भिंत तोडून आतमध्ये असलेल्या गाईला सुखरूप बाहेर काढले. मात्र, आगीच्या तीव्रतेमुळे या आगीत गुरांचा गोठा पूर्णपणे जळून खाक झाला आहे. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. तब्बल एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर बोरवेलच्या सहाय्याने ही आग विझविण्यात ग्रामस्थांना यश आले.







