दहा लाख 50 हजारांचा ऐवज जप्त
। ठाणे । प्रतिनिधी ।
ठाणे-मुंबईमध्ये दरोडा घालणाऱ्या केरळच्या दरोडेखोर टोळीला ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तसेच, त्यांनी लुटलेली दहा लाखाची रक्कमही जप्त केली आहे.
काळबादेवी येथील प्रॉमिस इंटरप्रिंसेस या कंपनीचा नोकर अरिफ अन्सारी हा मुंबई येथून तीस लाखांची रोकड घेऊन ठाणे रेल्वे स्टेशन येथील बी कॅबिन येथे पार्क केलेली दुचाकी गाडी काढत असताना या लुटारूंनी तीस लाखांची रोकड लुटून नेली होती. याबाबत नौपाडा पोलीस ठाण्यात 21 फेब्रुवारी 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा धागादोरा नसताना या चोरट्यांना केरळ येथून ताब्यात घेतले. तसेच, त्यांच्याकडून लुटलेल्या रकमेपैकी सात लाख 50 हजार आणि चोरीच्या पैशातून खरेदी केलेले तीन लाखांचे दोन मोबाईल असा एकूण दहा लाख 50 हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. सुहात खोता टी पी (31), विघ्नेश पोकेन के (30), प्रफूलदेव पुल्लिंवता (25), अखिल पी व्ही (27) आणि सुबीलेश बाळकृष्णन (31) असे अटक करण्यात आलेलया आरोपींची नावे आहेत.