| पाताळगंगा | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील वारद गावात अतिवृष्टीमुळे एका शेतकऱ्याच्या गुरांच्या वाड्याची पडझड झाल्याची घटना घडली. सुदैवाने घटना घडली त्यावेळी गुरे चरण्यासाठी बाहेर नेण्यात आली होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.
वारद येथील शेतकरी निवास शिंदे यांचा गुरांचा वाडा सततच्या मुसळधार पावसामुळे अचानक कोसळला. गेल्या अनेक दिवसांपासून परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जमिनीने पाणी पूर्णपणे मुरवून घेतले असून माती सैल झाली आहे. त्यामुळे वाड्याचा पाया कमकुवत होऊन संपूर्ण वाडा कोसळल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. घटना घडली त्यावेळी गुरे चरण्यासाठी बाहेर गेली होती. तसेच त्या ठिकाणी कोणीही व्यक्ती नसल्याने जीवितहानी टळली. अन्यथा गुरांसह माणसांच्याही जीवाला धोका निर्माण झाला असता. वाडा कोसळल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून गुरांच्या निवाऱ्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
सध्या खालापूर तालुक्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी घरांच्या भिंती खचणे, झाडे कोसळणे, तसेच जुन्या बांधकामांची पडझड होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः कच्ची घरे, गुरांचे गोठे धोकादायक बनले आहेत.
अतिवृष्टीमुळे गुरांचा वाडा कोसळला
