वाहनचालकांसह जनावरांच्या जिवाला धोका
। कोलाड । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गावरील आंबेवाडी बाजारपेठेतील रस्ता जणू उनाड गुरांचा गोठा बनला आहे. ही उनाड गुरे रस्त्यात बस्तान मांडून बसत असल्यामुळे वाहनचालकांसह प्रवासी वर्गाच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच, काहीवेळा उनाड गुरे देखील जखमी होत आहेत. या मार्गावर उनाड गुरांचे प्रमाण वाढले असून, याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देऊन त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
रोहा तालुक्यातील असंख्य शेतकर्यांनी आपल्या शेत जमिनी मुंबई-पुणे तसेच परप्रांतीय धनिकांना विकल्या आहेत. त्यामुळे येथील शेतकरी वर्ग जागे अभावी आपल्याकडील बिनकामी गुरे मोकाट सोडत आहेत. तसेच, या जमिनी विकत घेतलेल्या मालकांनी जमिनी भोवती तारेचे कुंपण घातले आहे. त्यामुळे गुरे चरण्यासाठी जागाच राहिलेली नाही. त्यामुळे ही गुरे चरण्यासाठी दिवसा जंगलात जातात व रात्री निवारा म्हणून बाजारपेठेतील रस्तातच बस्तान मांडून बसत आहेत. त्यामुळे या गुरांमुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे.
अनेक वेळा रात्रीच्या वेळी या महामार्गावरून जाताना अंधारात बसलेली गुरे पटकन दिसण्यात येत नाही. त्यामुळे अधिकतर दुचाकीस्वारांचे अपघात मोठ्या प्रमाणात होत असतात. त्यात दुचाकीस्वारांसह गुरे देखील गंभीर जखमी होतात. त्यामुळे याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देऊन या मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील आंबेवाडी बाजारपेठेतील रस्त्याच्या कडेला रात्रीच्या वेळी उनाड गुरे बस्तान मांडून बसत आहेत. प्रचंड अंधारात ही गुरे वाहन चालकांना दिसत नाही. त्यामुळे अपघात घडत आहेत. त्यामध्ये कधी प्रवासी तर कधी गुरे देखील जखमी होतात. त्यावर उपाय म्हणून उनाड गुरांच्या गळ्यात लाल फित बांधण्यात यावी. जेणेकरून अंधारात बसलेली गुरे त्वरित लक्षात येऊन अपघाताचा धोका टळेल. अन्यथा या गुरांची रीतसर नोंद करुन ही उनाड गुरे गो शाळेत पाठविण्यात यावी.
चंद्रकांत लोखंडे,
सामाजिक कार्यकर्ते