115 पैकी 80 वणवे विजविण्यात यश; सामाजिक संस्था बनल्या तारणहार
। पाली/बेणसे । वर्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील डोंगर पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर वणवे लागत आहेत. सततच्या वणव्यांमुळे सजीव सृष्टीची होरपळ होत आहे. दरम्यान, माणगाव व रोहा तालुक्यात मागील चार आठवड्यांत तब्बल 115 ठिकाणी वणवे लागल्याची नोंद झाली आहे. त्यापैकी 80 वणवे यशस्वीरित्या विझवण्यात सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेला यश आले आहे. त्यामुळे शेकडो वन्यजीव व वृक्षांची होरपळ रोखली गेली आहे.
सध्या वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यात काही समाज कंठकांकडून मुद्दामुन वणवे लावले जात आहेत. माळरानावरील सुकलेले गवत आणि उष्ण वातावरणामुळे हे वणवे रौद्र रूप धारण करतात. त्यामुळे वणव्याच्या कचाट्यात सापडणार्या वृक्षांची व वन्यजीवांची होरपळ होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदेचा र्हास होत आहे. नुकतेच माणगाव व रोहा तालुक्यातील 115 ठिकाणी वणवे लागल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 80 वणवे विझविण्यात काही सामाजिक संस्थांना यश आले आहे. त्यात सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था, रेस्न्यू चॅरिटेबल ट्रस्ट पुणे, दीपक नाइट्रेट लिमिटेड रोहा तसेच तटकरे युवा प्रतिष्ठान या टीमने सहभागी झाल्या होत्या. विशेष म्हणजे आधुनिक उपकरणांचा वापर करून जलद गतीने वणव्यांवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. यासाठी वनविभागाचे देखील मोलाचे सहकार्य लाभले आहे.
हे वणवे रोखण्यासाठी प्रयाग बामुगडे, श्वेता विश्वकर्मा, सागर दहिंबेकर, शुभम सणस, आदेश पाटेकर, अजय बोगटे, विशाल जाधव, निलेश लोखंडे अजय राजीवले, प्रणय सागवेकर, विनय ठाकूर, प्रवीण भगत, अनुप देशमुख, कृतिका वारंगे, विजया मगर, श्रावणी भोई, स्वयम् धनवडे, यश सानप, युतीश बारटक्के, सुजल पडवळ, ओंकार पडवळ आदींनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
तत्पर कामगिरी
टीम पर्यंत ज्यावेळी वनवे लागण्याची खबर पोहोचली त्यावेळी क्षणाचाही विलंब न करता ही टीम तत्परतेने वणवे विझवण्यासाठी पोहोचली. उपलब्ध साधनसामग्रीचा पुरेपूर वापर करून वणव्यांवर नियंत्रण मिळवता आले. दिवस असो की रात्र असो की रात्र टीम लागलीच वणवा लागला आहे, त्या ठिकाणी पोहोचून आपली कामगिरी तत्परतेने करत होती. तीव्र डोंगर उतार, दरी अशा धोक्याच्या ठिकाणी देखील जाऊन जीवाची बाजी लावून वणव्यांवर नियंत्रण मिळवण्यात आले.
जंगलाला लागणार्या वनव्यांसाठी आमची टीम अहोरात्र कष्ट करत आहे. त्यासाठी आम्ही ऑपरेशन अरण्य आपदव ही मोहीम राबवित आहोत. याकरिता आपण सर्वांनी सहभागी व्हावेत ही आमची इच्छा आहे. तरी आपल्या गावातील, शहरातील, सोसायटीतील जेवढे ग्रुप व लोक असतील त्यांनी वणवा लागल्यास आम्हाला संपर्क करा. जेणेकरून आपण अधिक गतीने वणवे नियंत्रणात आणू शकतो.
सागर दहिंबेकर,
सदस्य, सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था