सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत शहरात प्रशासकीय भवन उभे राहिले असून तेथे प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांची कार्यलये आहेत. त्या ठिकाणी कामानिमित्त येणारे नागरीक आपली वाहने प्रशासकीय भवनासमोरील मोकळ्या जागेत पार्क करत असतात. त्या ठिकाणी असलेले गटार वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्या गटारावर कोणतेही आवरण नसल्याने नुकतेच एका वाहनाचे चाक येथील गटारात अडकले होते. ते बाहेर काढताना चालकाच्या नाकेनऊ आले होते.
कर्जत येथील प्रशासकीय भवनाच्या बाजूला असलेल्या पोलीस मैदानात मोठ्या प्रमाणात गाड्या उभ्या केल्या जातात. मात्र, प्रामुख्याने प्रशासकीय भवनात कामानिमित्त आलेल्या नागरिकांना आपली वाहने सुरक्षीत ठिकाणी उभी करण्यासाठी खास अशी जागा निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे, भवनाच्या समोर सार्वजनिक बांधकाम विभागाचा जुना बंगला तोडण्यात आल्याने तेथे हे नागरीक आपली वाहने उभी करतात. मात्र, त्या ठिकाणी असलेल्या जागेमध्ये कुठेही सपाटीकरण करण्यात आलेले नाही. कुठेही संरक्षण भिंती नाहीत आणि असलेली गटारे हि उघडी व अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे कामानिमित्त आलेले नागरिक घाईगडबडीत त्या ठिकाणी आपली वाहने लावण्याठी जातात आणि तेथील उघड्या गटारात अडकतात. असे अपघात दररोज घडत असून वाहनांचे नुकसान होत आहे. त्यात गटारात पडलेली वाहने काढताना वाहनचालक आणि प्रवाश्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभाग येथील वाहनतळ क्षेत्र सुस्थितीत आणणार आहे की नाही, असा प्रश्न वाहनचालक उपस्थित करीत आहेत.