रांजणखार डावली (नवखार) येथील ग्रामस्थ, महिलांचा मोर्चा
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील रांजणखार डावली (नवखार) येथील गावांतील पाण्याचा प्रश्न कायमच भेडसावत आला आहे. जलजीवन योजना राबवूनदेखील या गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी पाण्यासाठी आक्रोश केला. अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी (दि.3) शासनाच्याविरोधात घोषणा देत मोर्चा काढला.
रेवस परिसरातील रांजणखार डावली (नवखार) येथील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेत जलजीवन योजना मंजूर करून घेतली. रोहीत पाटील या ठेकेदारामार्फत योजनेचे काम करण्यात आले. मात्र, अजूनपर्यंत या योजेनचे काम अपुर्णच आहे. गेल्या तीन वर्षापासून योजनेचे काम सुरु असतानाही संथगतीने सुरु असलेल्या कामामुळे या गावात पाण्याचा प्रश्न भेडसावू लागला आहे. अनेक वेळा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी यांच्यासमवेत चर्चा झाली. मात्र, आजपर्यंत या गावाला पाणी मिळाले नसल्याची खंत ग्रामस्थ व महिलांनी व्यक्त केली. अखेर या गावांतील महिला व ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात निषेध व्यक्त करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला. यावेळी डोक्यावर हंडा घेऊन ‘पाणी द्या’ अशा घोषणा देत ‘या शासनाचे करायचे, काय खाली डोके वरती पाय’, अशा तीव्र शब्दात सरकारसह प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच, पाणी पुरवठा नियमीत करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे.
गेली अनेक वर्षापासून रांजणखार डावली (नवखार) हे गाव पाण्यापासून वंचित राहिले आहे. गेल्या सहा वर्षापासून शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. फक्त तात्पुरत्या स्वरुपाची अश्वासने देण्यात आली आहेत. आंदोलन केल्यावर एमआयडीसीद्वारे पाणी पुरवठा केला जातो. पंधरादिवसानंर पुन्हा जैसे थे, अशी अवस्था असते. जलजीवन योजना राबवूनदेखील गावातील नागरिकांना पाणी नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी पाण्यासाठी लढा दिला आहे.
– हेमंत पाटील, ग्रामस्थ