चोरांना पकडण्यास तळा पोलिसांना अपयश
| तळा | प्रतिनिधी |
तळा तालुक्यात गुरे चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय झाली असून गेल्या महिन्या भरात किमान 15 ते 20 गुरांची चोरी झाली आहे. पूर्वी रात्रीच्या वेळी गुरे चोरण्याचे प्रमाण अधिक होते. परंतु, आता मात्र दुपारच्या वेळेस देखील गुरे चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. गुरे चोरणाऱ्या या टोळीला अटकाव करण्यात तळा पोलिसांना अपयश येत असल्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत.
तळा तालुका हा कष्टकरी, श्रमजीवी व शेतकरी वर्गाचा समावेश असलेला कृषिप्रधान तालुका आहे. याठिकाणी शेती व्यवसायबरोबर पशुपालन व दुग्धव्यवसाय केला जातो. अशातच गुरांच्या किमती वाढल्याने एखादे गाय अथवा बैल चोरीला गेला तर गोरगरीब सामान्य शेतकऱ्यावर आभाळ कोसळते. सध्या पावसाळा सुरू असल्याने शेतकरी दुपारच्या सुमारास गायींना गवत खाण्यासाठी वाड्याच्या जवळपास सोडतात. पुन्हा त्यांना आणायला गेले असता ती गुरे सोडलेल्या ठिकाणी नसतात. ही गुरे दुसऱ्या ठिकाणी चरत चरत गेली असली तरी ती पुन्हा त्याच ठिकाणी किंवा गोठ्यात परतात. परंतु, ती गुरे माघारी येतच नाही. त्यामुळे ही गुरे चोरी गेल्याचे कळते.
सध्या जनावरांच्या किमती खूप वाढल्या आहेत. एक बैल जोडीची किंमत जवळपास 1 लाख रुपयांपर्यंत पोहचली आहे. तर, एका गायीची किमंत लाखाच्या वर झाली आहे. सध्या बाजारात दुधाला चांगला भाव मिळत असल्यामुळेच शेतकरी वर्ग पशुपालन करण्याकडे वळला आहे. कर्ज काढून व्याज चक्रात फसून शेतकऱ्याला गुरे घ्यावी लागतात. मात्र, एकावेळी चार ते पाच गुरे चोरीला गेली तर त्या शेतकऱ्यावर मोठे आस्मानी संकट कोसळते. तसेच, शेतकऱ्याच्या कुटुंबावर उपासमारी सारखे संकट देखील ओढवत आहे.
पोलिसांना पुन्हा निवेदन
तळा तालुक्यातील वडाची वाडी, राणेचीवाडी, बामणघर, तारणे, रोहिदास नगर, पुसाटी, परिट आळी या भागात अनेक ठिकाणी दुग्ध व्यवसाय केला जातो. मात्र, गेल्या महिनाभरापासून या परिसरातून चार-पाच बैलजोडी, गाई आणि वासरांची चोरी झाली आहे. विशेष म्हणजे काही मिनिटांतच वाहनांतून ही चोरी होत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी व विविध राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी याबाबत पुन्हा एकदा तळा पोलीस ठाण्याला निवेदन देऊन गुरे चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली.






