सावधान; अन्यथा दर्या जीवावर बेतू शकतो

जीवरक्षकांचे सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन
। अलिबाग । वार्ताहर ।
फेसाळलेला दर्या, उंच, उंच लाटांचे अंगावर पडणारे खारट पाणी अंगावर घेणारे पर्यटक असं दृष्य सध्या अलिबागसह संपूर्ण रायगडातील समुद्र किनारी पहावयास मिळत आहे. अशावेळी पर्यटकांचा अतिउत्साह जीवावर बेतण्याची शक्यता असल्याने पर्यटकांनी सुरक्षित अंतर राखूनच पर्यटनाचा आनंद लुटावा, असे आवाहन जीवरक्षकांकडून केले जात आहे. सुटीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने अलिबाग समुद्रकिनारी येत आहेत, परंतु गेल्या दोन दिवसांपासून समुद्राला उधाण आले आहे. लाटांचा मारा जोरात सुरू आहे, मात्र त्याकडे काही पर्यटक दुर्लक्ष करीत मद्यपान करून बेधुंद होत समुद्रात मौजमजा करताना दिसत आहेत. पर्यटकांचा अतिउत्साह जीवघेणा ठरण्याची भीती स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.



पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा जिल्हा म्हणून रायगडची ओळख आहे. वर्षाला दहा लाखांहून अधिक पर्यटक जिल्ह्यात फिरण्यासाठी येत असून किहीम, नागाव, आक्षी, रेवदंडा, अलिबाग, श्रीवर्धन, दिवेआगर, काशीद, मुरूड अशा अनेक समुद्रकिनारी मौजमजा करतात. अलिबाग समुद्रकिनारी असलेल्या सुविधांमुळे पर्यटक येथील समुद्रकिनार्‍याला अधिक पसंती देतात. उन्हापासून बचावासाठी अनेक पर्यटक समुद्राच्या पाण्यात भिजण्याचा आनंद घेतात. मात्र गेल्या दोन दिवसांपासून समुद्राला उधाण आले आहे. लाटांचा मारा किनार्‍यावरही होत आहे. त्यात भिजण्याचा आनंद पर्यटक लुटत आहेत. त्यासाठी अनेकदा किनारा सोडून समुद्रातच दंगामस्ती करण्यातच पर्यटक समाधान मानतात. त्यातून अनेकदा पाण्याचा अंदाज न आल्याने अनेकजण समुद्राच्या लाटेबरोबर वाहून जातात. यापूर्वीही अनेकदा अशा दुर्घटना घडलेल्या आहेत. यासाठी अतिदक्षता बाळगणे हेच महत्वाचे ठरणारे आहे.

जीवरक्षकांच्या सुचनांकडे दुर्लक्ष
समुद्रकिनारी फिरणार्‍या पर्यटकांना स्थानिक जीवरक्षकांकडून खोल समुद्रात पोहण्यास बंदी घातली जात आहे, परंतु तरीही काही उत्साही पर्यटक मद्यपान करून जीवरक्षकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत जीवाची पर्वा न करता बेधुंदत होत समुद्रात पोहण्यासाठी जात आहेत. या प्रकारामुळे एखाद्या पर्यटकाचा जीव जाण्याची भीती व्यक्त होत जात आहे. अशा अतिउत्साही पर्यटकांवर पोलिस प्रशासनासह स्थानिक प्रशासनाने अंकुश ठेवावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version