रायगडात सीसीटीव्ही कॅमेराचे जाळे उभारणार; दुधे साई सहारा हॉटेल येथील चौकीचे लोकार्पण

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
वाढती गुन्हेगारी आणि त्यासाठी वापरण्यात येणारी वाहने या गोष्टींवरती नियंत्रण मिळविता यावे यासाठी रायगडचे प्रवेश द्वार असलेल्या पेणमध्ये मुंबई गोवा महामार्गावर आता पोलिसांच्या तिसर्‍या डोळ्याची करडी नजर राहणार आहे. तसे सूचक उद्गार पोलीस अधिक्षक अशोक दुधे यांनी काढले आहेत.
पेण तालुक्यातील आंबिवली फाटा दरम्यान हॉटेल साई सहारा हॉटेल समोर पोलिस मदत चौकी तसचे अत्याधुनिक तंत्रज्ञाना युक्त असे नंबर प्लेट डिटेक्टर सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले. मुंबई गोवा महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठीचे देवदूत कल्पेश ठाकूर यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या पोलिस चौकी आणि सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे अशोक दुधे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सी.सी.टि.व्ही कॅमेर्याचे जाळे जिल्हाभरात निर्माण करण्यात येणार असून यातून गुन्हेगारीला आळा बसेल असा विश्‍वास व्यक्त करीत अशा उपक्रमांसाठी दानशूर लोकांनी पुढे यावे असे आवाहन पोलिस अधिक्षक अशोक दुधे यांनी यावेळी केले.

Exit mobile version