। सुतारवाडी । वार्ताहर ।
सुतारवाडी नाक्यावर दसर्यापूर्वीच सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्यामुळे अनेक गोष्टींना आळा बसला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यापूर्वी सुतारवाडी नाक्यावर एका दुकानात चोरीचा प्रकार घडला होता. याच प्रकारे एका अज्ञाताने नाक्यावर लावलेला एक बॅनरही फाडले होते. सीसीटीव्ही कॅमेरामुळे आता नाक्यावर घडणार्या सर्व गोष्टींचा रेखा जोगा कळणार असल्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सुतारवाडी नाका हा सोळावाड्यांचे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्याचप्रमाणे सुतारवाडी परिसरात अनेक फार्म हाऊस असल्यामुळे नेहमी या परिसरामध्ये सातत्याने पर्यटकांची गर्दी असते. सुतारवाडीपासून पुणे हे अंतर शंभर किमी असल्यामुळे येथून सातत्याने वाहतूक चालू असते. याचप्रमाणे सुतारवाडीपासून आठ किलोमीटर अंतरावर विळे बागड परिसरामध्ये अनेक कंपन्या असल्यामुळे या परिसरातून अनेक अवजड वाहने सातत्याने धावत असतात. या सर्वांवर आता सीसीटीव्ही कॅमेराची करडी नजर राहणार आहे. यामुळे आता या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही.