उरण चारफाटा भागावर सीसीटीव्हीची नजर

पत्रकार संघाच्या मागणीला यश

| उरण | वार्ताहर |

उरण चारफाटा भागावर आता सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर राहणार आहे. सीसीटीव्ही कॅमेर्‍यांमुळे उरण चारफाटा शहरातील प्रवेशाचे प्रमुख मार्गावर चारही बाजूने नजर राहणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या पार्श्‍वभूमीवर ओएनजीसी प्रशासनाच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे. यामुळे उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या मागणीची दखल ओएनजीसी कंपनीने घेऊन उरण शहरातील प्रमुख चौक म्हणून समजल्या जाणार्‍या उरण चारफाटा येथे सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. याबद्दल पत्रकार संघाने ओएनजीसी कंपनी प्रशासनाचे आभार मानून इतर कंपनी प्रशासनाने अशाप्रकारे सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली आहे.

वाढत्या विकासाबरोबर शांतता सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचा सारासार विचार करून शासकीय यंत्रणेने सीसीटीव्हीची नितांत गरज लागणार असल्याने ही मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने लावून धरली होती.

याची दखल उरण ओएनजीसी कंपनी प्रशासनाने घेऊन उरणमधील प्रमुख रहदारीचा मार्ग समजल्या जाणार्‍या उरण चारफाटा येथील हायमास्ट दिव्याच्या पोल वर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे या भागात होणार्‍या कोणत्याही घटनांची माहिती सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद होणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षितता निर्माण होणार आहे. परिसरातील छोटी मोठी गुन्हेगारी पाहता सीसीटीव्हीची गरज वाढली आहे. बसवल्या जाणार्‍या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामुळे गुन्हेगारी रोखण्यासोबतच गुन्हे उघडकीस येण्यास मदत होणार आहे. कॅमेरे सर्व दिशेस कव्हर करत असल्याने कोणताही परिसर याच्या नजरेतुन सुटत नाही. सदर सीसीटीव्ही ओएनजीसी कंपनी प्रशासनाने जरी बसविले असले तरी त्याचा फायदा उरणच्या जनतेला निश्‍चित होणार आहे. त्यामुळे तालुक्यातील इतर कंपनी प्रशासनाने पुढाकार घेऊन आपल्या कंपनी बरोबर जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली आहे.

Exit mobile version