‌‘होळी करा लहान, पोळी करा दान’

अंनिस, समाजसेवी संस्थेचा उपक्रम; गोरगरिबांची होळी झाली गोड

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात होळी सण विधायक पद्धतीने साजरा करण्यात आला. अनेक सामाजिक व स्वयंसेवी संस्था तसेच दानशूर व सुज्ञ नागरिक आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या माध्यमातून होळीमध्ये जाणाऱ्या शेकडो पुरणपोळ्या आदिवासी वाडी, झोपडपट्टी आणि वृद्धाश्रमात वाटण्यात आल्या. त्यामुळे गोरगरींबांची होळी गोड झाली. या माध्यमातून गोरगरिबांप्रती असलेली भावना आणि समाजसेवेची ओढ अतिशय प्रेरणादायी आहे. अशा प्रकारे सण साजरे करणे हे समाजातील एकता आणि सेवाभावाचे एक उत्तम उदाहरण आहे.

पालीत एक संघर्ष समाजसेवेचा व महा. अंनिस तर्फे मागील अकरा वर्षांपासून ‌‘होळी करा लहान, पोळी करा दान’ हा उपक्रम सातत्याने सुरु आहे. यावेळी पालीतील लहान मोठ्या होळ्या येथून जवळपास 1 हजार पेक्षा जास्त पुरणपोळ्या जमा करण्यात आल्या. याशिवाय, फळे आणि पापड फेण्याही वाटपासाठी गोळा करण्यात आल्या. येथील तळई व दापोडे आदिवासीवाडी आणि टेंभी वसाहत येथे त्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम मयूर थळे, श्रीकांत ठोंबरे, संदेश सोनकर, संदीप महाडिक, किशोर चौधरी, रोशन रुईकर व अमित निंबाळकर आदींनी यशस्वी केला.



तर, रोहा महा. अंनिस शाखेच्यावतीने माळखंड वाडी येथील श्री काळकाई प्रसन्न वृद्धाश्रमामध्ये पुरणपोळ्या आणि फळांचे वाटप केले. यावेळी रोहा शाखा अंनिस शाखा अध्यक्ष डॉ. फरीद चिमावकर, उपाध्यक्ष दत्तात्रेय शेडगे, सचिव दिनेश शिर्के यांच्यासह अनिकेत पाडसे, मुमताज मुलानी, धनाजी जाधव, प्रमोद खांडेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या बरोबरच पेण महा. अंनिस शाखेतर्फे देखील पेण रेल्वे लाईनला लागून असलेल्या झोपडपट्टीतील लहान मुले आणि महिलांना पुरणपोळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी रमाकांत घरत आणि संदेश गायकवाड उपस्थित होते.

‌‘होळी करा लहान, पोळी करा दान’ हा उपक्रम अनेकांनी उत्स्फूर्तपणे अवलंबला आहे. बहुतांश होळी मंडळे आणि रोटरी क्लब सारख्या संस्था स्वतः पुरणपोळ्या वाटप करू लागल्या आहेत. ही एक चांगली आणि स्वागतार्ह बाब आहे. जो विचार फक्त आमचा होता तो आता आपल्या सर्वांचा झाला आहे. होळी सणाच्या या विशेष प्रसंगी, समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन गरिबांना आनंद आणि आशेचा संदेश दिला आहे. हा उपक्रम समाजातील सर्व घटकांच्या सहभागाने यशस्वी झाला आहे.

संदेश गायकवाड,
कार्याध्यक्ष, महा. अंनिस, रायगड
Exit mobile version