। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
जेएसएम महाविद्यालयामध्ये मंगळवारी (दि. 21) सकाळी 7.30 वा. आठवा आंतरराष्ट्रीय योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पतंजली योगा समिती, रायगडचे महामंत्री सुहास शिंदे सुहास, सुहास धाणू, गौतम लेवूआ, दिपक गाटे, पतंजली योगपीठ, जिल्हा रायगडचे युवा भारत प्रभारी हे उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. अनिल पाटील, एन.सी.सी. अधिकारी डॉ. मोहसिन खान, एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण गायकवाड, डॉ. मीनल पाटील, डॉ. सुनील आनंद, जिमखाना समिती प्रमुख डॉ. ईश्वर कोकणे, शारीरिक शिक्षण शिक्षक बी.आर. गुरव, तसेच इतर प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, एन.एस.एस. स्वयंसेवक आणि एन. सी. सी. कॅडेट्स या कार्यक्रमात सहभागी झाले. जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील यांनी आंतरराष्ट्रीय योगा दिन कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
योगा शिक्षक दीपक गाटे व शिंदे यांनी उपस्थितांना वेगवेगळ्या ‘आसनांचा’ पद्धतशीर सराव करून दाखवला. योगाभ्यास दरम्यान, योगा शिक्षक गौतम लेउवा यांनी विविध आसनांचा उपयोग, अनेक रोग बरे करण्यासाठी आणि मानवाच्या सर्वांगीण कल्याणासाठी योगाची उपयुक्ततादेखील सांगितली. योगाभ्यास दरम्यान वेगवेगळी आसने केली. ज्यामध्ये ताडासन, वृक्षासन, पद-हस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोनासन, भद्रासन, वज्रासन, उस्त्रासन, मकरासन, भुजंगासन, सालभासन, सेतुबंधासन, उत्तानपदासन, शवासन, कपालभाती, भ्रमारिका व इतर प्राणायामाचे प्रकार यांचे प्रात्यक्षिके करून दाखवली व त्याचे आपल्या शरीर व मनाला होणारे फायदे विशद केले. या कार्यक्रमासाठी एकूण 158 जणांनी सहभाग घेतला. यामध्ये 45 एन. एस. एस. स्वयंसेवक, 43 एन. सी. सी. कॅडेटस, 30 विद्यार्थी आणि 25 प्राध्यापक व 15 शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एन.एस.एस., एन.सी.सी. विभाग आणि जिमखाना विभाग यांनी संयुक्त विद्यमाने केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण गायकवाड यांनी, डॉ. मीनल पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.