इर्शाळवाडीच्या चिमुकल्यांसोबत दिवाळी साजरी

| रसायनी | वार्ताहर |
इर्शाळवाडीच्या चिमुकल्यांना घेऊन दिवाळी साजरी करताना ही आठवण मनाच्या कोपऱ्यात कायमची बसून राहील. या दुर्घटनाग्रस्तांना अनेकांनी मदत केली, पण स्थानिक पातळीवर स्थानिक प्रशासनाने केलेल्या कार्याबद्दल त्यांचे कौतुक करणे आवश्यक आहे, असे उद्गार खासदार श्रीकांत शिंदे यांनी काढले.

खा. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्यावतीने इर्शाळवाडीच्या कंटेनर हाऊस येथे दिवाळी सणाच्या निमित्ताने खा. श्रीकांत शिंदे यांनी इर्शाळवाडी येथे येऊन चिमुकले आणि दुर्घटनाग्रस्त यांच्यासोबत फराळ खाऊन व फटाके वाजवून दिवाळी साजरी केली. त्यावेळी खा. श्रीकांत शिंदे बोलत होते.

19 जुलै 2023 च्या रात्री इर्शाळवाडीची भयानक व दुर्दैवी घटना घडली. यात 84 जण मृत्युमुखी पडले. त्यानंतर मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार चौक हद्दीतील एका पेट्रोल पंपावर कंटेनर हाऊसमध्ये त्यांची राहण्याची सोय करण्यात आली. राज्य सरकार यांच्याबरोबर खा. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांनीही दुर्घटनाग्रस्तांच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारून मदतीचे काम सुरु केले. यावेळी खा. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्यावतीने सर्वांना दिवाळी फराळ, भेटवस्तू, कपडे, फटाके देण्यात आले. खासदार श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या वतीने 42 कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात आली. अनेक मान्यवर व संस्था यांनी दिवाळी भेटवस्तू आणल्या होत्या, त्यांचेही वाटप खा. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. माजी आ. देवेंद्र साटम व आ. महेंद्र थोरवे यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष अधिकारी मंगेश चिवटे, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अहिरराव, प्रांत अधिकारी अजित नैराळे, तहसीलदार आयुब तांबोळी, चौक सरपंच रितु ठोंबरे, नगरसेविका सुप्रिया साळुंखे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version