कृषीवलचा हळदीकुंकू सोहळा उत्साहात

स्त्रीशक्तीच्या अस्मितेचा सन्मान; सुवासिनींनी लुटलं सौभाग्याचं वाण

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात नंबर वन ठरलेला कृषीवलचा हळदीकुंकू सोहळा मंगळवारी (दि.16) मोठ्या उत्साहात पार पडला. स्त्रीशक्तीच्या अस्मितेचा सन्मान व्हावा, महिलांचे संघटन व्हावे, एकोपा वाढावा आणि संस्कृतीचे संवर्धन व्हावे या उद्दात्त हेतूने हा कार्यक्रम आयोजित केल्याचे शेतकरी कामगार पक्षाच्या रायगड जिल्हा महिला आघाडीप्रमुख तथा कृषीवलच्या संचालक चित्रलेखा पाटील यांनी आवर्जून सांगितले. अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या या सोहळ्याचे यंदाचे 28वे वर्ष होते. मराठी तारकांच्या उपस्थितीने महिलांचा आनंद द्विगुणित झाला. उत्साहात पार पडलेल्या या सोहळ्यात हजारो सुवासिनींना सौभाग्याचं वाण देण्यात आलं. महिलांच्या जिव्हाळ्याचा कार्यक्रम आयोजित केल्याने चित्रलेखा पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

1 / 7

विचारांची देवाण-घेवाण करीत जिल्ह्यातील सर्वच स्तरातील महिलांसोबत नात्याचा संबंध जपण्याचा प्रयत्न हळदीकुंकू समारंभाच्या माध्यमातून चित्रलेखा पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आला. दुपारी तीन वाजल्यापासून ग्रामीण शहरी भागातील महिलांनी पीएनपी नाट्यगृहात येण्यास सुरुवात केली. महिलांची अलोट गर्दी झाली. पारंपारीक मराठमोळा पेहराव करीत आलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळा उत्साह दिसून आला. मकर संक्रांतीचे औचित्य साधत राबविलेल्या या उपक्रमाचा आनंद महिलांनी मनमुरादपणे घेतला. ‌‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असा संदेश या कार्यक्रमाच्या रुपातून महिलांपर्यंत महिलांनी पोहोचविण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक महिलांचे औक्षण झाल्यावर त्यांना सौभाग्याचं वाण देण्यात आले. विलोभनीय सांजशृंगार करून हळदीकुंकू समारंभात दाखल झालेल्या सुवासिनींनी सौभाग्याचे वाण लुटले. एकमेकींना हळदीकुंकू लावून विचारांचे आदानप्रदान करण्यात आले. या सोहळ्यात हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या महिलांनी सेल्फीचा आनंदही घेतला.

2 / 7

सिनेतारका ठरल्या आकर्षण
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातील चेतना भट आणि रसिका वेंगुर्लेकर, ‌‘अबोल प्रीतीची अजब कहाणी' मालिकेतील यामिनी म्हणजे अभिनेत्री दीप्ती केतकर आणि मयुरी म्हणजे अभिनेत्री जान्हवी तांबट, ‌‘मराणी मी होणार' मालिकेतील मीरा म्हणजे अभिनेत्री संचिता कुळकर्णी, ‌‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं' मालिकेतील बयो म्हणजे अभिनेत्री विजया बाबर या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यांचे आगमन होताच महिलांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा आनंद अनेक महिलांनी घेतला. यावेळी सोनी मराठी वाहिनीचे असोसिएट प्रोड्युसर राज राजशेखर, सीनीअर प्रोड्युसर प्राची वाळंजू, मार्केटिंग विभागाचे सीनिअर मॅनेजर वत्संक बक्षी, मार्केटिंग हेड साईनाथ पाई, सुहाना टीमचे विजय कावीणकर, अजित ठाकूर, रितेश पनवेलकर, अभिषेक सोनावणे, भूषण सोनार, स्वप्नील विसपुते आदी उपस्थित होते.
3 / 7
कलाकारांनी साधला महिलांशी संवाद
सोनी मराठी वाहिनीवरील वेगवेगळ्या मालिकेतील सिनेतारका या कार्यक्रमाच्या निमित्ताने दाखल झाल्या होत्या. अभिनेत्रींना पाहण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी महिलांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी त्यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. एक वेगळा आनंद या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांनी लुटला. महिला सशक्तीकरणासाठी महिलांना एकत्र आणून प्रबोधन करण्याबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमातून त्यांचा सहभाग वाढवून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम चित्रालेखा पाटील यांनी या कार्यक्रमातून केल्याने अनेक महिलांनी समाधान व्यक्त केले.
4 / 7
विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
कृषीवलनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू समारंभात अलिबाग नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुनीता नाईक, अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्या भावना पाटील, शैला पाटील, जिल्हा परिषद माजी बांधकाम व अर्थ सभापती चित्रा पाटील, कृषीवलच्या व्यवस्थापकीय संचालिका चित्रलेखा पाटील, अलिबागच्या माजी उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, माजी नगरसेविका वृषाली ठोसर, संजना कीर, कविता ठाकूर, काजल ठाकूर, रुपाली म्हात्रे, मुळेच्या सरपंच सुहानी पाटील, सुडकोलच्या सरपंच प्रीती तांबडकर, डॉ. मेघा घाटे, कृषीवलच्या संपादिका माधवी सावंत, जाहिरात व्यवस्थापिका हर्षा पाटील, दर्शना पाटील, संपादकीय, वितरण, जाहिरात, बायडींग विभागाच्या महिला कर्मचारी, शेकाप तालुका महिला आघाडी प्रमुख प्रीती पाटील, नागेश्वरी हेमाडे, अश्विनी ठोसर, भूमी कोळी, सुकन्या साखरकर, अनिता पवार, स्नेहलता लडगे, अंजू ठाकूर आदी महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा अलिबागच्या शाखाधिकारी श्रीमती गोळे, प्रार्थना नागवेकर, उमा आठवले, श्रेया शिंदे, गीता साळवी, सदस्य, वेश्वीच्या उपसरपंच आरती पाटील, चौलच्या माजी सरपंच माजी सरपंच रुपाली म्हात्रे, नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर, निशा ठाकूर, पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या सर्व महिला कर्मचारी, जिल्ह्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदचे माजी पदाधिकारी, सदस्य, विद्यमान पदाधिकारी, सदस्य, अलिबाग, रोहा, मुरुडसह पाली येथील हजारो महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
5 / 6
स्टॉलमध्ये खरेदीसाठी झुंबड
हळदीकुंकू समारंभात मीना खाकी पावडर, सुहाना मसाले, टॉयटो कंपनीची कार, पीएनजी एज्युकेशन, महिला बचत गटाचे खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारण्यात आले. या स्टॉलमध्ये लोणचे पापड, मसाले पदार्थ, पाणीपुरी आदी खाद्यपदार्थांसह पावडर, वेगवेगळ्या रंगाच्या कारचे प्रदर्शन भरविण्यात आले. या स्टॉलमध्ये महिलांची खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली होती. मसाले पदार्थ खरेदीसह खाद्य पदार्थांचादेखील आनंद महिलांनी घेतला. पीएनपी एज्युकेशन सोसायटीमार्फत शिक्षणाचे महत्त्वदेखील या उपक्रमातून पटवून देण्यात आले.
Exit mobile version