। कोर्लई । वार्ताहर ।
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा 76 वा वर्धापनदिन मुरुड आगार प्रमुख राहुल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा करण्यात आला. बीएसआरटीसीची पहिली बस 1 जून 1948 यादिवशी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. सदरची बस पुणे येथील पहिले चालक तुकाराम पांडुरंग पठारे व वाहक लक्ष्मण केवटे यांनी चालवली. पुढे भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेनंतर मुंबई, मध्यप्रांत आणि संपुष्टात आलेल्या निजाम राज्याचा भाग मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. त्या भागातील वाहतूक सेवा करीत असलेल्या संस्थाही बीएसआरटीसीमध्ये विलीन करून नव्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी)या नावाने महामंडळाचा कारभार सुरू राहिला. याचा पुढे विस्तार होऊन वटवृक्ष झाला.
राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धापनदिन दिनानिमित्ताने मुरुड आगारातील नियंत्रण कक्षात सुशोभीकरण करण्यात येऊन सुबक आकर्षक सजावट, रांगोळी काढण्यात आली. आगारातील एस.टी.बसला सुशोभीत करण्यात आले होते. आगार प्रमुख राहुल शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवाशी यांच्याहस्ते केक कापून वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी आगार व्यवस्थापक राहुल शिंदे, सहाय्यक वाहतूक निरीक्षक गौतम भोसले, देविदास जाटळे प्रमुख कारगिर रुझार अंकल, आगार लेखाकार अक्षय भोईर, हरिशचंद्र पाटील, संतोष नाईक, लक्ष्मण मल्हार,साईश कारभारी,विरेश जंजिरकर, नामदेव ढाके, लक्ष्मण पांचाळ, विंदा धनावडे सर्व चालक वाहक कर्मचारी तसेच यांत्रिक कर्मचारी उपस्थित होते.






