। सुतारवाडी । वार्ताहर ।
रोहा तालुक्यांतील अनेक ग्रामीण भागात ठिकठिकाणी आषाढी एकादशीनिमित्त जेष्ठ नागरिक, तरुण वर्ग तसेच शालेय विद्यार्थ्यांनी परिसरातील विठ्ठल-रखुमाई मंदिरापर्यंत पायी दिंडी काढून विठू नामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या तालात विठुरायाचे दर्शन घेतले. जामगाव प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका प्रिया टोकसे यांनी आपल्या शाळेतील पारंपारिक पोशाखात वारकरी तयार करुन रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामगावापासून जामगावात प्रवेश केला. नंतर येथील तमाम ग्रामस्थ ही या दिंडीत पारंपारिक पोशाख करुन सहभागी झाले होते. हरिनामाचा जप, फुगडया, ताळमृदंग यांनी सारा परिसर दुमदुमला होता. लहान मुलांनी छोटी पालखी हातात घेवून त्यामध्ये विठ्ठल-रखुमाईची मूर्ती विराजमान करून गावामधुन विठ्ठल रखुमाई मंदिरापर्यंत विद्यार्थ्यांसह गावांतील सर्व महिला, जेष्ठ नागरिक, तरुणवर्ग सहभागी घेऊन पायी दिंडीवारीचा आनंद लुटला. यावेळी महिलांनी आपल्या डोक्यावर तुळशी रोप घेवून दिंडीत सहभाग दर्शविला. या दिंडीत जामगाव व आठलेवाडीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जामगाव-आठलेवाडी ग्रामस्थांप्रमाणे ढोकलेवाडी येथील ग्रामस्थांनीसुद्धा आपल्या गावाच्या मंदिरात टाळमृदुंगाच्या स्वरात मोठया भक्तीभावाने आषाढी एकादशी सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा केला.