पेझारी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी

को.ए.सो. लक्ष्मी शालिनी महिला महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

कुसुंबळे | वार्ताहर |
को.ए.सो.महिला महाविद्यालय पेझारी येथे नुकताच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९१ व्या जयंती निमित्त मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाने मार्गदर्शन करण्यासाठी महाविद्यालय स्थापनेच्या पहिल्या वर्षाची माजी विद्यार्थिनी गीता भोईर – पाटील तसेच १६ वर्षापूर्वीची माजी विद्यार्थिनी जिविता पाटील यांना महाविद्यालयीन मुलींना मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून आमंत्रित करून समाजापुढे एक आदर्श दाखवून दिला. सर्वप्रथम क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आमंत्रित माजी विद्यार्थिनींच्या शुभहस्ते करण्यात आले. प्राध्यापक वर्गाने यावेळी सन्मानपूर्वक माजी विद्यार्थिनींचे स्वागत केले. आपल्या मार्गदर्शनात प्रमुख वक्त्या गीता भोईर पाटील यांनी आपले अनुभव व्यक्त करीत असताना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची ओळख सांगून कॉलेज जीवनातल्या काही गंमतीशीर अनुभव सांगून जुन्या आठवणींना उजाळा देत शिक्षणाविषयी प्रबोधन करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. प्रमुख वक्त्या व माजी विद्यार्थिनी जिविता पाटील यांनी जीवन एक रंगमंच आहे ज्याच्यावर प्रत्येक स्त्रीला एक स्त्री म्हणून वेगवेगळ्या भूमिका व जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात असे सांगून प्रत्येक स्त्रीने ध्येय, जिध्द, चिकाटी यांच्या जोरावर अडचणींवर मात केली पाहिजे असा सल्ला उपस्थित विद्यार्थिनींना दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य डॉ.दिलीप पाटील यांनी माजी विद्यार्थींच्या कार्याची ओळख करून देत आजपर्यंत कॉलेजमधून यशस्वीरित्या शिक्षण घेत चांगल्या पदांवर कार्यरत असणाऱ्या माजी विद्यार्थिनींची उदाहरणे उपस्थित विद्यार्थिनींना देत मोलाचे मार्गदर्शन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे अतिशय सुंदर पध्दतीने सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापक डॉ. भटू वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन निहा पाटील या विद्यार्थिनीने केले. यावेळी सहयोगी प्राध्यापक महेश बिऱ्हाडे, सहाय्यक प्राध्यापक डॉ.अनिल बांगर, सहयोगी प्राध्यापिका
डॉ.संगीता चित्रकोटी सहाय्यक प्राध्यापक दिलीप सोनवणे, संतोष बिरारे, सारीका म्हात्रे, शोभा टेमकर, जोत्स्ना पाटील निलेश कुलाबकर, समीर पाटील इ.चे बहुमूल्य सहकार्य लाभले.

Exit mobile version