जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांचा न्यायालयात पत्रव्यवहार
| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील बोरगाव हद्दीतील बहुचर्चित सेलिब्रेशन रिसॉर्ट प्रकरणात आता नवे वळण आले आहे. 23 मार्च रोजी पेण पोलिसांनी या रिसॉर्टवर छापा टाकून कथित कुंटणखाना उघडकीस आणला होता. या कारवाईत तीन महिलांची सुटका करण्यात आली होती, तर घटनास्थळावरून चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
या प्रकरणातील आरोपींच्या चौकशीतून रिसॉर्ट मालक गणेश गायकर, गणेश अण्णा, राजू मंडळ आणि सुरेश मेहता यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित आरोपी फरार होते. त्यानंतर गणेश गायकर, गणेश अण्णा आणि राजू मंडळ यांनी अलिबाग सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता; मात्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावला.
यानंतर आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. यामध्ये राजू मंडळ यांचा जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केला, तर गणेश गायकर यांना काही अटी व शर्तींवर जामीन मंजूर करण्यात आला. मात्र, उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना घातलेल्या महत्त्वाच्या अटींपैकी एक अट म्हणजे सेलिब्रेशन रिसॉर्ट संदर्भातील कराराची प्रत 12 मे 2026 पर्यंत पेण पोलीस ठाण्यात जमा करणे ही होती. परंतु, मुदत उलटून गेल्यानंतरही संबंधित कराराची प्रत पोलिसांकडे जमा करण्यात आली नसल्याचा दावा करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर गणेश गायकर यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप होत असून, पेण पोलिसांनी 14 मे रोजी न्यायालयाकडे पत्रव्यवहार करून त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. आता या प्रकरणात न्यायालय काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अटींचे पालन न केल्यास गणेश गायकर यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
