रेवदंड्यात शेकापच्या विजयाचा जल्लोष

संतोष मोरे यांची विजयी मिरवणूक; जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रेवदंडा ग्रामपंचायतीवर शिंदे गटाची सत्ता असतानाही शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष मोरे यांची उपसरपंच म्हणून बहुमतांनी निवड झाली. त्या निमित्ताने रेवदंड्यामध्ये शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ऐतिहासिक विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. रेवदंडा येथील पारनाका ते संतोष मोरे यांच्या निवासस्थानापर्यंत फटाक्यांची आतषबाजी करीत मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली.

1 / 10

यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य तथा शेकापचे ज्येष्ठ नेते द्वारकानाथ नाईक, शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य तथा शेकाप तालुका माजी चिटणीस अनिल पाटील, शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख अनिल गोमा पाटील, दादा मोरे, सुरेश खोत, शरद वरसोलकर, निलेश खोत, निलेश गाडे, रेवदंड्याच्या माजी सरपंच सोनाली मोरे, ॲड. परेश देशमुख, दत्ता ढवळे, नागावचे माजी सरपंच नंदकुमार मयेकर, दिपक पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अनंत पाटील, सुरेंद्र नागलेकर, शुभांगी कोंडे, मनिषा चुनेकर, खलिल तांडेल, प्रमोद (बाळू) नवखारकर, अशोक नाईक, संगिता पाटील, विजय चौलकर, संदीप खोत, हेमंत पाटील, अशिष पाटील, दर्पण चौलकर, अनिल बाईट, सलीम गोंडेकर, शरद पाटील, राजू चुनेकर, दिलीप धुमाळ, कृष्णा गायकर, सुशील सुर्वे, शेकाप व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रेवदंडा ग्रामपंचायतीच्या शिंदे गटातील उपसरपंच मंदा बळी यांचे अतिक्रमण बांधकामप्रकरणी उपसरपंच पद आणि दिक्षा बळी यांचे सदस्यत्व रद्द झाले होते. त्यामुळे ही जागा रिक्त होती. मंगळवारी (दि.2) उपसरपंचपदाची निवडणूक झाली. या निवडणूकीत गुप्त मतदान प्रक्रीयेत शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष मोरे यांना 9 मते मिळाली. शिंदे गट महायुतीचे उमेदवार सुराराम माळी यांचा दारूण पराभव झाला. विरोधकांची सत्ता असतानाही या निवडणूकीत शेकाप महाविकास आघाडीचे उमेदवार संतोष सदाशिव मोरे यांना बहुमत मिळाले. या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष गुरुवारी (दि.4) दुपारी रेवदंड्यामध्ये साजरा करण्यात आला.

सुरुवातीला रेवदंडा पारनाका येथील श्री हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेण्यात आले. त्यानंतर विजयाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी “शेतकरी कामगार पक्ष, महाविकास आघाडीचा विजय असो”, अशा घोषणा देण्यात आल्या. फटाकांच्या आतषबाजीबरोबरच बेंजोच्या वाद्याने संपुर्ण रेवदंडा परिसर दुमदुमून गेला. या मिरवणूकीत अनेकांनी नृत्य देखील केले. ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला, तरुण मंडळी या मिरवणूकीत उत्स्फुर्तपणे सहभागी झाली होती. या निमित्ताने एक वेगळा उत्साह पहावयास मिळाला. संतोष मोरे यांच्या घरापर्यंत काढण्यात आलेल्या या मिरवणुकीच्या क्षणाचे छायाचित्र अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये काढले. काहींनी सेल्फीचा आनंद लुटला. संतोष मोरे यांच्या घराजवळ मिरवणूक पोहचल्यावर शेकाप सरचिटणीस जयंत पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य द्वारकानाथ नाईक तसेच नवनिर्वाचित उपसरपंच संतोष मोरे यांचे औक्षण करण्यात आले. यावेळी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन संतोष मोरे यांचे अभिनंदन करण्यात आले.

Exit mobile version