| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कर्जत-नेरळ-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील बेकरे पुलाच्या वरच्या भागात असलेल्या सिमेंट बंधार्याचे सांडवा जोरदार पावसाने फुटला आहे. त्या सांडव्यामुळे भविष्यात बेकरे गावातील पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
कर्जत-कल्याण रस्त्यावर बेकरे गावाच्या जवळ पुलावर सिमेंट बंधारा बांधण्यात आला. त्या ठिकाणी पाली-भूतीवली लघुपाटबंधारे प्रकल्प असून, त्या धरणाच्या पाझर तलावातील पाणी याच बेकरे पुलाच्या खालून वाहणार्या नाल्यातून वाहून जात असते. त्यावेळी स्थानिक ग्रामस्थांच्या मागणीनंतर सिमेंट बंधारा बांधण्यात आला. त्या बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधार्याच्या पाण्याचा उपयोग त्या भागातील नळपाणी योजना अवलंबून आहेत. त्याचवेळी त्या ठिकाणी असलेल्या गणेश घाट येथे धार्मिक विधी होत असतात. त्यासाठी पाण्याचा उपयोग महत्त्वाचा असतो. गेल्या काही वर्षात त्या सिमेंट बंधारा हा महत्त्वाचा ठरला आहे.परंतु, मागील महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्या पावसाच्या पाण्याने सिमेंट बंधारा ओसंडून वाहत होता. मात्र, पडणारा पाऊस हा थांबत नव्हता आणि शेवटी सिमेंट बंधार्याचे सांडवा हा सिमेंटचा असूनदेखील फुटला आहे. त्यामुळे भविष्यात त्या भागात पाण्याचा साठा कमी होणार आहे.
बेकरे पुलाच्या वरच्या भागात असलेल्या सिमेंट बंधारा येथे तेथील पाण्यावर अवलंबून असलेल्या नळपाणी योजना यांचे उद्भव आहेत. त्या फुटलेल्या सांडल्यामुळे सिमेंट बंधार्याचा पाण्यावर अवलंबून असलेल्या नळपाणी योजना पाणी कमी होणार आहे. सांडवा फुटल्याने पाटबंधारे खात्याने त्या बंधार्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक शेतकर्यांनी केली आहे.