स्मशानभूमी रस्ता, बोरअवेलची जागा हडप करण्याचा कट

प्रांत, तहसीलकडे लेखी तक्रार करुनही दुर्लक्ष
पेण | वार्ताहर |
पाबळ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात गौवाळावाडी हे गाव असून, या गावाची स्मशानभूमी नदीशेजारी आहे. या स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता डोलवी येथील रहिवासी मधुकर दामाजी पाटील यांनी अडविला असून, रस्ता व बोअरवेलवर कब्जा करुन अवैधरित्या ताब्यात घेतले असून, येथील ग्रामस्थांना धमकाविण्याचे काम करीत आहेत. याबाबत प्रांत व तहसील कार्यालयात लेखी निवेदन दिले असून, याबाबत कोणतीही कार्यवाही दोन्ही कार्यालयांकडून करण्यात आलेली नाही.
दरम्यान, स्मशानभूमीमध्ये जाण्यासाठी गट नं. 104 मधून रस्ता आहे. ही जागा हरीभाउ वसंत कदम यांची असून, हरीभाउ यांचे वडील वसंत कदम यांनी 40 वर्षापूर्वीच गौवाळावाडी गावाच्या ग्रामस्थांना स्मशानभूमीत ये-जा करण्यासाठी दिली असून याच जागेत गौवाळावाडी ग्रामस्थांनी गावाच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून बोरवेळ (विंधन विहिर) खोदलेली आहे. मात्र डोलवी गावचे रहिवाशी मधुकर दामाजी पाटील यांनी या ग्रामस्थांच्या रस्त्यावर व बोरअवेलवर कब्जा करुन अवैधरित्या ताब्यात घेतले आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे गट नं. 105 ही जागा मधुकर पाटील यांची आहे. परंतु 104 वर कब्जा करुन भोळयाभाबडया अशिक्षित महिलांना शिवीगाळ करुन तंगडया तोडण्याची धमकी मधुकर पाटील करत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या अदिवासी बांधवांनी स्व खर्चात स्मशानभूमीचे बांधकाम केलेले आहे. तसेच गेली कित्येक वर्ष याच स्मशानभूमीत ते अंत्यविधी करत आहेत. याबाबत गौवाळावाडी ग्रामस्थांनी 8 जून 2021 ला तहसिल कार्यालय व प्रांत कार्यालय पेण येथे लेखी निवेदन देखील दिले आहे. या निवेदनामध्ये पूर्ण गावच्या ग्रामस्थांनी सहया देखील केलेल्या आहेत.  मात्र दोन्ही कार्यालयातून आतापर्यंत कोणतीच कारवाई मधुकर पाटील यांच्या विरुध्द करण्यात आलेली नाही. तसेच मधुकर पाटील यांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याने अदिवासी बांधव घाबरले आहेत. तसेच पूर्ण गौवाळावाडी गाव दहशतीखाली असल्याचे दिसून आले. आमचा वार्ताहार गौवाळावाडी येथे गेला असता गौवाळावाडीला पाणी पुरवण्याचा स्त्रोत असलेली बोरिंगभोवती कुंपण घातलेले आढळून आलेले दिसले आहे. सदर निवेदनाबाबत प्रांत कार्यालयातून कारवाई का झाली नाही. याबाबत प्रांत अधिकार्‍यांना विचारणा केली असता; त्यांनी सांगितले की, सदर अर्जाची दखल घेतली असून तलाठयांना स्थळ पंचनामा करण्यास सांगितला आहे. तसेच मधुकर पाटील यांना भ्रमंती ध्वनी वरुन संपर्क केला असता त्यांना संपर्क होऊ शकला नाही. 

Exit mobile version