महामार्गाचे काम रखडले
नॅशनल हायवेविरुद्ध संताप
पेण | वार्ताहर |
कांदळे, कांदळेपाडा व उचेडे गावालगत नॅशनल हायवे जात असून, सदर रस्ता रुंदीकरणाचे काम मागील चार ते पाच वर्षापासून सुरू आहे. सदर कामाबाबत संबंधित ठेकेदार, तहसिलदार पेण, प्रांत कार्यालयाकडे वारंवार पत्र व्यवहार करून कामे योग्य रितीने व वेळेत पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे सरपंच कांदळे व ग्रामस्थ कांदळे यांच्या शिष्टमंडळाने व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रांत कार्यालयात जाउन प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांची भेट घेउन आपली व्यथा मांडली व रस्ता रोको करणार असल्याचे सांगितले.
यावेळी रोडे सरपंच स्वप्निल म्हात्रे, अविनाश भोईर, केशरीनाथ गावंड, हर्षल गायकर, यांच्यासह पत्रकार बंधू उपस्थित होते. प्रशासनाला दिलेलया निवेदनात असे नमूद केले आहे की, नॅशनल हायवेच्या संबंधित ठेकेदार यांनी हॉटेल पुष्पक ते हॉटेल साईलिला पर्यतचा सर्विस रोड, सर्विस रोडच्या दोन्ही बाजूची गटारे, नाल्यांना संरक्षण भिंती, जुने गणपती विसर्जन घाट, उचेडे शाळेची संरक्षक भिंत व शेतकर्यांच्या शेतीचे पाणी जाण्याचा मार्ग व रस्त्याची कामे योग्य रितीने पूर्ण न केल्यामुळे पुष्पक हॉटेल पासून हॉटेल साईलिला कांदळे पर्यत जाणार्या रस्त्याची संपूर्ण चाळण झाली असून पुढे साईलिला येथे असणार्या बोगदयाच्या दोन्ही बाजूला मोठमोठे खड्डे असल्याने तेथे अपघात होण्याची दाट शक्यता असून सदर ठिकाणी अपघात झाल्यास त्यास जबाबदार कोण? तसेच नॅशनल हायवेच्या बेजबाबदारपणामुळे दि.11 जुलै 2021 रोजी मळेघर येथील एक तरुण रोड अॅक्सीडंटमध्ये मृत्यु झाला आहे. नॅशनल हायवेच्या या बेजबाबदार वर्तनामुळे ग्रामस्थ संतप्त होवून रस्ता रोको अंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. तरी आपणांस या निवेदनाद्वारे नम्र विनंती करण्यात येते की, सदर रस्त्याची अपुर्ण कामे तातडीने पुर्ण करणे बाबत आपल्या कार्यालयाकडून संबंधित ठेकेदाराला सुचित करावे, जेणेकरून ग्रामस्थांना होणारा त्रास तसेच होणारे अपघात टाळता येतील, असे पत्र अधिकार्यांना दिले आहे.
प्रांत कार्यालयातून वेळोवेळी ठेकेदाराला सुचना देउन ही ठेकेदार काम करत नसल्याने ग्रामस्थांना मोठया संकटाला सामोरे जाव लागत आहे. जर अधिकार्यांनाच ठेकेदार जुमानत नसेल तर सर्वसामान्य जनतेच काय? प्रांताधिकार्यांनी येत्या चार दिवसात कांदळेपाडा गावाकडे जाणारा सर्विस रोड व पुष्पक हॉटेलसमोर गतीरोधक टाकण्याचे आश्वासन दिले आहे, तसेच सर्व सरपंच व अधिकारी वर्ग यांच्या संयुक्त बैठकीचे देखील आयोजन करण्याचे सांगितले आहे.
गेले पाच वर्ष नॅशनल हायवेचे काम चालू आहे. आम्ही प्रांतांना निवेदन दिलेल आहे आणि जर लवकरात लवकर याच्यावर मार्ग निघाला नाही तर आम्ही रस्ता रोको केल्या शिवाय शांत बसणार नाहीत.
मुरलीधर भोईर