कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या शिक्षकांच्या कुटुंबांना दिलासा द्या; आ. बाबासाहेब देशमुखांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
जनगणना कर्तव्यावर असताना निधन झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबांना आर्थिक मदत करा, अशी मागणी शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री यांना निवेदन दिले असून सांगोल्यासह राज्यातील इतर घटनांचाही गांभीर्याने विचार व्हावा, अशी बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी केली.
राष्ट्रीय जनगणना-2027 चे कर्तव्य बजावत असताना तीव्र उष्माघाताने निधन झालेल्या सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे आदर्श शिक्षक कै. राजेंद्र दामोदर ढोले यांच्या कुटुंबाला शासनाने तात्काळ आर्थिक मदत द्यावी. केवळ सांगोलाच नव्हे, तर सध्याच्या भीषण उन्हात कर्तव्य बजावताना राज्यभरात इतरही अनेक ठिकाणी अशा दुर्दैवी घटना घडल्या आहेत. शासनाने या संपूर्ण परिस्थितीचा व्यापक विचार करून राज्यातील सर्वच शिक्षकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न तातडीने निकाली काढावा, अशी आग्रही मागणी सांगोला विधानसभेचे आ. बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे. यासंदर्भात आ. देशमुख यांनी मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन सुपूर्द केले.
या अत्यंत संवेदनशील प्रकरणाबाबत माहिती देताना आमदार बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले की, कै. राजेंद्र ढोले हे राष्ट्रीय कर्तव्य बजावत असताना उष्माघाताचे बळी ठरले आहेत. त्यांच्या अकाली निधनामुळे ढोले मळा (सांगोला) येथील त्यांचे कुटुंब संपूर्णपणे उघड्यावर पडले आहे. मात्र, ही समस्या केवळ सांगोला पुरती मर्यादित नसून, सध्या संपूर्ण राज्यात तापमान 42 ते 44 अंशांच्या पार गेल्याने जनगणना करणाऱ्या राज्यातील अनेक शिक्षकांना उष्माघाताचा तीव्र त्रास होत आहे. काही ठिकाणी शिक्षकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. त्यामुळे शासनाने या सर्व प्रकरणांकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, असे सांगण्यात आले.
सांगोल्यातील पीडित कुटुंबाला तात्काळ मदत. राष्ट्रीय किंवा शासकीय कर्तव्यावर असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या शासकीय नियमाप्रमाणे कै. ढोले यांंच्या कुटुंबाला देय असणारी अनुग्रह अनुदान रक्कम विनाविलंब मंजूर करून ती त्वरित अदा करण्यात यावी. मृत शिक्षक कै. ढोले यांच्या कुटुंबातील पात्र व्यक्तीस प्राधान्य देऊन तातडीने अनुकंपा तत्त्वावर शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे. सध्याच्या भीषण उन्हात राज्यातील इतरही भागांत ज्या शिक्षकांवर अशा दुर्दैवी घटना ओढवल्या आहेत, त्या सर्व ठिकाणची माहिती शासनाने तातडीने मागवून घ्यावी आणि त्या सर्व पीडित शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांनाही समान न्याय देऊन आर्थिक व प्रशासकीय दिलासा द्यावा. उन्हाची तीव्र लाट लक्षात घेता जनगणनेच्या क्षेत्रीय कामाच्या वेळेत बदल करण्यात यावा किंवा शिक्षकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात. सुरक्षेसाठी ठोस धोरण स्विकारण्यात यावे, अशी मागणी आ. देशमुख यांनी केली आहे.







