बृजभूषण सिंह यांना केंद्र सरकारचा धक्का

नव्या कुस्ती महासंघाची मान्यता रद्द

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

नव्या कुस्ती महासंघाची मान्यता रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातं आहे. कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष आणि बृजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांना देखील पदावरुन हटवण्यात आले आहे. त्यामुळे सरकारकडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह यांची नियुक्ती झाली होती. त्यामुळे नाराज झालेल्या कुस्तीगीर साक्षी मलिकने खेळातून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता. तर कुस्तीगीर आणि ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया याने आपले पद्म पुरस्कार परत केले होते. वाद वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची कोंडी झाली होती. नव्याने नियुक्त केलेल्या कुस्ती महासंघाची मान्यताच रद्द करण्यात आली. जवळपास वर्षभराने कुस्ती महासंघाची निवडणूक झाली होती. त्यात बृजभूषण सिंह यांचा दबदबा पाहायला मिळाला. महत्त्वाच्या पदावर त्यांच्याच समर्थकांची नियुक्ती झाली होती. बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीगीरांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. त्यांच्यावर कारवाईची मागणी करत क्रिडापटूंकडून काही महिन्यांपूर्वी मोठे आंदोलन उभारण्यात आले होते.

सरकारकडून कारवाईचे आश्वासन देण्यात आल्यानंतर कुस्तीगीरांनी आंदोलन मागे घेतले होते. पण, निवडणुकीत पुन्हा बृजभूषण यांनाच संधी मिळाल्याने काही कुस्तीगीर नाराज झाले होते. यातूनच दोन कुस्तीगीरांकडून टोकाचे पाऊल उचलण्यात आले होते. त्यांना इतर खेळाडूंकडून पाठिंबा वाढत चालला होता. याची दखल केंद्र सरकारने अखेर दखल घेतली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार लोकशाही पद्धतीने निवडणुका घेण्यात आल्या आणि मंडळाची स्थापना झाली. आता फेडरेशन सदस्यांचा निर्णय आहे की त्यांना सरकारशी बोलायचे आहे की कायदेशीर कारवाई करायची आहे. मला याच्याशी काही देणेघेणे नाही, असे भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version