चार महिन्यांत कोट्यवधींची कमाई

उरण रेल्वे मार्गावरील आठ स्थानकांतून लाखो प्रवाशांची वाहतूक

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण-नेरुळ-बेलापूर या रेल्वे मार्गावरील उरण, द्रोणागिरी, न्हावा-शेवा, शेमटीखार, खारकोपर, बामण डोंगरी, तारघर आणि गव्हाण या आठ स्थानकांतून जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांतच 45 लाख 67 हजार 542 प्रवासी वाहतूक झाली आहे. या चार महिन्यांत मध्यरेल्वेने 3 कोटी 36 लाख 29 हजार 545 रुपयांची कमाई केली आहे.

जानेवारी 2024 पासून उरण-नेरुळ-बेलापूर या रेल्वे मार्गावरून प्रवासी वाहतूकीला अखंडपणे सुरूवात झाली आहे. गतवर्षी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत उरण, द्रोणागिरी, न्हावा-शेवा, शेमटीखार, खारकोपर आणि बामण डोंगरी या सहा स्थानकांतुन 41 लाख 97 हजार 117 प्रवाशांची वाहतूक झाली होती. त्यावेळी मध्य रेल्वेने 2 कोटी 56 लाख 89 हजार 807 रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर आता या रेल्वे मार्गावरील गव्हाण व तारघर ही दोन स्थानके कार्यान्वित झाली आहेत. त्यामुळे उरण, द्रोणागिरी, न्हावा-शेवा, शेमटीखार, खारकोपर, बामण डोंगरी, तारघर आणि गव्हाण या आठ स्थानकांतून यंदा जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात 45 लाख 67 हजार 462 प्रवासी वाहतूक झाली आहे. त्यामुळे यंदा प्रवाशांच्या संख्येत 3 लाख 70 हजार 425 एवढी वाढ झाली आहे. मध्यरेल्वेने या चार महिन्यात 3 कोटी 36 लाख 29 हजार 545 रुपयांची कमाई केली आहे, अशी अधिकृत माहिती मध्य रेल्वे प्रशासन अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, एक-एक तासाच्या अंतराने सोडण्यात येणाऱ्या लोकलमुळे प्रवाशांना तास-दीड तासांपर्यंत ट्रेनसाठी प्रतीक्षा करावी लागते. नाईलाजाने प्रवाशांना कंटाळून इच्छितस्थळी पोहचण्यासाठी इतर साधनांनी प्रवास करावा लागत आहे. तसेच, बेलापूर व उरण स्थानकातून रात्री साडेदहा वाजता शेवटची लोकल सुटते. त्यामुळेही प्रवाशांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रयत्न करण्याची प्रवाशांची मागणी आहे.

Exit mobile version