| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा माजी आमदार जयंत पाटील यांच्या कार्याचा गौरव करताना काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी त्यांना “महाराष्ट्राचा संघर्षयोद्धा” अशी उपाधी दिली. ‘जयंत पाटील यांच्यासारखे नेतृत्व पुन्हा महाराष्ट्राला मिळाले पाहिजे. सत्ता नसतानाही त्यांचा दबदबा, आदर आणि प्रभाव कायम आहे.
50 वर्षांचा राजकीय अनुभव असलेले असे नेतृत्व शोधण्यासाठी गुगलची गरज नाही. रायगडच्या मातीतच असा नेता उभा आहे, असे म्हणत त्यांनी जयंत पाटील यांचा गौरव केला. सरकारला धारेवर धरणे, प्रश्न तडीस नेईपर्यंत पाठपुरावा करणे आणि कोणत्याही दबावापुढे न झुकणे हीच त्यांची खरी ओळख आहे,” असे गौरवोद्गार सतेज पाटील यांनी काढले. मंगळवारी (दि.7) अलिबागमधील पीएनपी नाट्यगृहात आयोजित शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी करमळाचे आमदार नारायण पाटील, रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, सार्वजनिक वाचनालयाच्या कार्याध्यक्षा शैला पाटील, ॲड. राजेंद्र कोरडे, खजिनदार अतुल म्हात्रे, जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकापचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख शिवानी जंगम, संतोष जंगम, शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत, तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे, अनिल पाटील, ॲड. परेश देशमुख, विजय गिदी, नागेश कुलकर्णी, अलिबाग पंचायत समिती सदस्या अंजली ठाकूर, नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर, रेवदंड्याचे उपसरपंच संतोष मोरे, ॲड. विजय पेढवी, उध्दव ठाकरे गटातील शिवसेनेचे रायगड जिल्ह्यातील नेते सुरेंद्र म्हात्रे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील थळे, काका ठाकूर, ॲड. उमेश ठाकूर, अभिष्टचिंतन समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, संजय पाटील, शेकाप तालुका महिला आघाडी प्रमुख नागेश्वरी हेमाडे आदी जिल्हा, तालुका चिटणीस मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, वेगवेगळ्या आघाडींचे पदाधिकारी, सदस्य, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समितीचेे माजी पदाधिकारी, अलिबाग नगरपरिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक सदस्य, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा अशा सर्वच क्षेत्रातील पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, महिला, तरुण वर्ग यांच्यासह राज्यातील दिग्गज मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सतेज पाटील यांनी आपल्या भाषणात पाटील घराण्याच्या सामाजिक, सहकारी आणि राजकीय योगदानाचा गौरव करताना सांगितले की, स्वर्गीय नारायण नागू पाटील, प्रभाकर पाटील आणि ॲड. दत्ता पाटील यांनी घालून दिलेल्या पुरोगामी विचारांच्या वाटेवर जयंत पाटील यांनी आयुष्यभर चालण्याचा निर्धार केला. रायगडच्या अलिबाग तालुक्यातून सुरू झालेला त्यांचा प्रवास संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे.
2004 पासून विधान परिषदेतील त्यांचे कामकाज जवळून पाहिल्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, शेतकरी कर्जमाफी, किसान मोर्चा, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनग्रस्त शेतकऱ्यांना न्याय, समाजकारण आणि सर्वसामान्यांचे प्रश्न यासाठी जयंत पाटील यांनी सातत्याने संघर्ष केला. कोणताही पक्ष सत्तेत असला तरी जयंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे सरकारला द्यावीच लागत होती. कारण, ते प्रश्न मांडण्यासाठी नव्हे, तर ते मार्गी लावण्यासाठी लढत असत, असे त्यांनी स्पष्ट केले.
गोंधळातही संयम, पण मुद्द्यावर ठाम
विधान परिषदेत अनेकदा गोंधळाचे वातावरण निर्माण व्हायचे. सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने उभे राहात असताना सभागृह सुरळीत चालविण्यासाठी मध्यस्थी करणारे नेतृत्व म्हणजे जयंत पाटील होते, असे सांगत सतेज पाटील म्हणाले की, त्यांनी अनेकदा संघर्ष मिटवला; पण स्वतःच्या भूमिकेवर किंवा जनतेच्या प्रश्नांवर कधीही माघार घेतली नाही. संघर्ष आणि सामंजस्य यांचा योग्य समतोल राखण्याची कला फार थोड्या नेत्यांकडे असते आणि जयंत पाटील त्यातील एक आहेत.
टक्केवारीत न अडकलेला नेता
आजच्या राजकारणात विचारांपेक्षा सत्तेला अधिक महत्त्व दिले जात असल्याची खंत व्यक्त करत सतेज पाटील म्हणाले की, अशा काळातही जयंत पाटील यांनी पुरोगामी विचारांची मशाल विझू दिली नाही. राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा त्यांनी आपल्या राजकारणातून जपला आहे. आजच्या राजकारणासारखं टक्केवारीचं राजकारण त्यांनी कधीही केलं नाही. विचारांचे प्रदूषण वाढत असताना ते विचारांनीच संपवावे लागेल, असे सांगत त्यांनी तरुणांनी जयंत पाटील यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.
सहकार वाचविण्याचे मोठे योगदान
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा उल्लेख करत सतेज पाटील म्हणाले की, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सहकारी बँका अडचणीत आल्या; मात्र रायगडमध्ये सहकार जिवंत ठेवण्याचे मोठे श्रेय जयंत पाटील यांना जाते. सहकार हा केवळ बँकिंगचा विषय नसून, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे हजारो शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबांना आधार मिळाला.
कामांची पाटी न लावणारे आमदार
जयंत पाटील यांनी आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. ज्यांना मोठे केले त्यांनीही काही काळात साथ सोडली; मात्र त्यामुळे त्यांच्या जनाधारावर कोणताही परिणाम झाला नाही. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त झालेली प्रचंड गर्दी हेच सिद्ध करते की, सत्ता नसली तरी लोकांच्या मनावर राज्य करणारे नेतृत्व म्हणजे जयंत पाटील, असे सतेज पाटील म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, आज पडद्यावर अनेक जण नायक बनण्याचा प्रयत्न करत आहेत; पण राज्य आणि रायगड जिल्ह्याचे खरे नायक जयंत पाटील आहेत, हे सर्वांना मान्य करावे लागेल. त्यांनी हजारो विकासकामे केली. मात्र, त्याचे श्रेय घेण्यासाठी पाट्या लावल्या नाहीत, तसेच मार्केटिंग केले नाही. अपयशानंतर पुन्हा उभे राहण्याची ताकद त्यांच्यात आहे आणि त्यामुळेच भविष्यातील सूर्य त्यांचाच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
2029 ची आमदारकी शेकापचीच
कार्यकर्त्यांना संबोधित करताना सतेज पाटील यांनी आगामी निवडणुकांसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. मतदार पुनरिक्षण मोहिमेत प्रत्येक कार्यकर्त्याने सक्रिय सहभाग घ्यावा, अन्यथा आपल्या विचारांचे मतदार वगळले जाण्याचा धोका असल्याचा इशारा त्यांनी दिला. “अलिबागमध्ये यापूर्वी 90 हजार मते मिळाली. पुढील निवडणुकीत दीड लाख मतांचे लक्ष्य ठेवून 2029 च्या आमदारकीची मुहूर्तमेढ रायगडमधूनच रोवायची आहे. एका बाजूला दिखाऊ राजकारण आहे, तर दुसऱ्या बाजूला सर्वसामान्यांचे अश्रू पुसणारे राजकारण आहे. भविष्यात संस्कार, विचार आणि जनतेच्या प्रश्नांवर आधारित राजकारण उभे करायचे आहे,” असे आवाहन त्यांनी केले.










