शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
| चिरनेर | प्रतिनिधी |
आतुरतेने वाट पाहिली त्याच पावसाने यंदा उरण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला अपेक्षित असणारा पाऊस जूनच्या अखेरीस उशिरा सुरू झाला. या पावसात भात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी चांगल्या हंगामाची स्वप्न पाहिली होती. मात्र, त्यानंतर सलग कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे भात बियाणे शेतातच कुजून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे मोठे संकट ओढावले आहे.
यंदा पावसाने सुरुवातीलाच दडी मारल्याने पेरण्या उशिरा झाल्या. त्यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर अचानक झालेल्या धुवाधार पावसामुळे भात खाचरामध्ये पाणी साचून राहिले. चार ते पाच दिवस पाणी न ओसरल्याने भाताचे राब अक्षरशः कुजून गेले. महागडी बियाणे विकत घेऊन पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना आता पुन्हा बियाणांचा शोध घ्यावा लागत आहे. बाजारातही बियाणे उपलब्ध नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उरण तालुक्यातील औद्योगिकरणामुळे शेतीचे क्षेत्र आधीच कमी झाले आहे. त्यातच यंदाच्या अवकाळी पावसाने उरली सुरली अशाही हिरावून घेतली आहे. महागडे बियाणे, वाढलेले मजुरीचे दर आणि पेरणीचे झालेले नुकसान यामुळे अनेक शेतकरी यंदा काही क्षेत्र पडीक ठेवण्याच्या विचारात आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत दुबार पेरणीसाठी मोफत अथवा अनुदानित बियाणे व सरसकट पंचनामे करून, भरपाई देण्याची मागणी येथील शेतकऱ्यांकडून होत आहे.
अति पावसामुळे भात खाचरामध्ये पाणी साचल्याने भात रोपांची उगवणच झाली नाही. काही ठिकाणी उगवलेली रोपेही दहा टक्केच उगवली असून, अत्यंत विरळ व कमकुवत आहेत.
– प्रफुल्ल खारपाटील, कृषीमित्र







