केंद्रीय जलजीवन मिशन समितीची रायगड जिल्ह्यास भेट

100 टक्के नळजोडणी झालेल्या ग्रामपंचायतींना मार्गदर्शन
अलिबाग | वार्ताहर |
जलजीवन मिशन अंतर्गत रायगड जिल्ह्यातील 100 टक्के नळजोडणी पूर्ण झालेल्या खालापूर तालुक्यातील होनाड, साजगाव, शिरवली व अलिबाग तालुक्यात आंबेपूर, चेंढरे याठिाकणी केंद्रीय जलजीवन मिशन समितीने दि.28 व 29 ऑक्टोबर रोजी भेट दिली. जलजीवन मिशनचे अवर सचिव अविनाश कुमार सिन्हा, कार्यक्रम व्यवस्थापक व सनियंत्रण व मूल्यमापन तज्ज्ञ अर्पित गुप्ता आदींचा समावेश आहे.
दरम्यान, ग्रामपंचायतीमधील पाणीपुरवठा योजनेच्या माहितीसह प्रत्यक्ष कुटुंबांना भेटी देऊन वैयक्तिक नळ जोडणीबाबत पाहणी करण्यात आली. या भेटीदरम्यान ग्रामपंचायत सदस्यांसमवेत पाणी गुणवत्ता, एफटीके किटद्वारे पाणी तपासणी, स्त्रोत बळकटीकरण, पाणीपुरवठा समितीच्या भूमिका व जबाबदारी, शाश्‍वत पाणीपुरवठा, देखभाल दुरुस्ती, वॉटर मीटरचा वापर, पाऊस पाणी संकलन आदी संदर्भात चर्चेच्या माध्यमांतून मार्गदर्शन केले.
यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, राजिपचे कार्यकारी अभियंता अरविंद येजरे, उपअभियंता श्री. बिराजदार , श्री. वेंगुर्लेकर, श्री. इंगळे, स्मिता पाटील, जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षाचे आनंद धिवर, सुनील माळी, अदिती मगर, नेहा थळे, गट समन्वयक, समूह समन्वयक, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, ग्रामसेवक व ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या समितीने शाळा, अंगणवाडी व गाव परिसरातील पाणी व स्वच्छतेच्या सुविधांबाबत प्रत्यक्ष पाहणी केली, तसेच ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. सदर क्षेत्रीय भेटीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील व उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक यांचे मार्गदर्शन लाभले.

Exit mobile version