खोपोली ब्राह्मण सभेच्या वतीने सत्कार समारंभ

खोपोली | प्रतिनिधी |
कोरोनाच्या कालावधीमध्ये उत्कृष्ट सेवाकार्य करत असलेल्या तसेच विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय यश मिळवणार्‍या सदस्यांचा खोपोली ब्राह्मण सभेच्या वतीने रविवार, दि. 3 ऑक्टोबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत विशेष सत्कार करण्यात आला.
संस्थेच्या कै. विमलताई मुकुंद बिवरे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात वासुदेव सेवा मंडळाचे लक्ष्मीकांत खरे, रा.स्व. संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून विविध सेवा कार्य करणारे जिल्हा कार्यवाह नितीन भावे व रोहित कुलकर्णी, सीएच्या परीक्षेत प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण झालेल्या उन्नती फणसे व कौस्तुभ जोशी तसेच क्रिकेटमध्ये जिल्हा पातळीवर चमक दाखवणारे अंकित पेठे व काश्मीरमध्ये उरी ते बारामुल्ला हे 68 किलोमीटर अंतर सायकलिंग करणार्‍या रोहिणी टिळक या मान्यवरांचा संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र हर्डीकर, उपाध्यक्षा सुनिता पाटणकर, कार्यवाह अनिल रानडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी खजिनदार सुधाकर भट, सहखजिनदार अंबादास पाठक, सहकार्यवाह वृषाली बेलसरे, संस्थेचे माजी अध्यक्ष दीपक बाम, मोरेश्‍वर दाते, विजय गोखले, राजेंद्र पेठे, अनिषा बिवरे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.

Exit mobile version