शिवगर्जनेतून महाराजांना मुजरा

जिल्ह्यात ठिकठिकाणी छ. शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी गुरुवारी (दि.19) जयंती साजरी करण्यात आली. जिल्ह्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांसह वेगवेगळ्या उपक्रमांतून महाराजांच्या प्रतापाची महती सांगण्यात आली. यावेळी शिवगर्जनेतून महाराजांना मुजरा करीत शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. एक वेगळा उत्साह या निमित्ताने जिल्ह्यात दिसून आला.

अलिबाग नगरपरिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. नगराध्यक्ष अक्षया नाईक, उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक प्रदिप नाईक, अनिल चोपडा, ॲड. अश्वीनी ठोसर, ॲड. निवेदिता वाघमारे, मुख्याधिकारी सागर साळुंखे आदी मान्यवरांसह वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, अलिबाग नगरपरिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिवजन्मोत्सव ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या अफजल खान वधाची कथा नृत्यातून सादर केली. यावेळी प्रेक्षकांकडून प्रतिसाद मिळाला. अलिबागसह रायगड जिल्हयात ठिकठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात आली. काही संस्था, संघटनेच्या वतीने बाईक रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले होते. ‘जय शिवाजी, जय भवानी’ असा जयघोषाने संपुर्ण जिल्हा दुमदूमून गेला. तरुणांसह अनेकांनी पारंपरिक पेहराव करीत, हातात भगवा झेंडा फडकवीत महाराजांचा जयघोष केला. त्यामुळे अलिबाग शहरासह ग्रामीण परिसर महाराजांच्या जयघोषाने दुमदूमून गेला. गावांतील तरुणांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पोवाडयाचे सादरीकरण करीत महाराजांच्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम केले. एक वेगळा उत्साह व उमेद घेऊन अलिबागसह संपूर्ण जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.

सायंकाळी सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची महती सांगण्यात आले. महाराजांचा जन्म, अफजलखानाचा वध, गड किल्ल्यांवरील लढाई अशा सर्वच कार्याचा उलगडा या कार्यक्रमांतून करण्यात आला. शिवकालीन मर्दानी खेळाच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा या राज्यगीताचे ठिकठिकाणी अत्यंत उत्साहात गायन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासह वेगवेगळ्या शासकीय कार्यालयात, शाळांमार्फत तसेच सामाजिक, शैक्षणिक अशा वेगवेगळ्या संस्था, संघटनांच्या वतीने जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली.

दुचाकी रॅलीतून मानवंदना
अलिबाग तालुक्यासह रायगड जिल्हयातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी पोवाडे लावण्यात आले. काही ठिकाणी सकाळी तर काही ठिकाणी सायंकाळी दुचाकी रॅली वेगवेगळ्या संस्था, संघटनाच्या वतीने काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून महाराजांना मानवंदना देण्यात आली. महाराजांचे विचार घराघरात पोहचविण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला.
Exit mobile version