छ.शिवाजी महाराजांचा विचार प्रेरक ठरेल

नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे प्रतिपादन
। महाड । प्रतिनिधी ।
किल्ले रायगडावर छ. शिवाजी महाराजांनी आपला देह ठेवला, त्या किल्ले रायगडावर छ. शिवरायांची 342 वी पुण्यतिथी शनिवारी (दि.16) साजरी करण्यात आली. श्रीशिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे आणि स्थानीक उत्सव समिती महाड यांच्या वतीने शिवपुण्यतिथी सोहळाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे उपस्थित होते. छ.शिवाजी महाराजानी जातीपातीच्या आणि अंधश्रधेच्या पलीकडे जात अखंड भारताचे स्वप्न साकार केले. बहुजन हिताय, बहुजन सुखाय या त्यांच्या विचारातूनच देश पुढे गेला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला आ.भरतशेठ गोगावले, समितीचे अध्यक्ष रघुजी आंग्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
किल्ले रायगडावर श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ पुणे या लोकमान्य टिळक यांनी स्थापन केलेल्या संस्थेतर्फे गेली अनेक वर्ष शिवपुण्यतिथीचे आयोजन केले जाते. सलग दोन वर्षानंतर यावर्षी श्री शिवपुण्यतिथी कार्यक्रम आयोजित केला गेला. या शिवपुण्यतिथी कार्यक्रमाला उपस्थित राहीलेले देशाचे नागरी उड्डाण मंत्री आणि महान सेनानी महादजी शिंदे यांचे वंशज ज्योतिरादित्य सिंधिया यांनी प्रथम महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर त्यांनी छ.शिवाजी महाराजांना अभिवादन केले. राजदरबार स्थळी झालेल्या सभेत बोलताना ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपण पाहुणे नसून या मातीमधलाच एक असल्याचे सांगितले. छ.शिवाजी महाराजांच्या सेवा आणि समर्पण या दोन गुणांचा अवलंब केल्यास देशाचे कल्याण होईल असे सांगितले. मराठ्यांचा इतिहास देशाच्या कानाकोपर्‍यात असून शौर्य, बलिदान, आणि वीरता असलेला इतिहास असल्याचे सांगितले.
समितीच्या वतीने देण्यात येणारा श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार भारतीय नौदलातील निवृत्त सर्जन कमांडर व इतिहास संशोधक डॉ.उदय कुलकर्णी यांना देण्यात आला, तर विशेष सत्कार सैन्यदल अधिकारी व्हाईस अडमिरल मुरलीधर पवार यांचा सपत्नीक करण्यात आला. यावेळी सुभेदार तानाजी मालुसरे व सूर्याजी मालुसरे यांच्या वंशजांचा सत्कार देखील करण्यात आला. शिवरायमुद्रा आणि शिवऋशिंची शिवसृष्टी या ग्रंथांचे प्रकाशन देखील करण्यात आले.

Exit mobile version