शेतकरी, मच्छिमारांचे नुकसान भरपाईसाठी साखळी उपोषण

| उरण | वार्ताहर |

ओएनजीसी प्रकल्पातून तेलगळतीनंतर शेतकरी, मच्छिमार, नागरिक आणि ओएनजीसी प्रशासनाशी नुकसान भरपाई देण्याबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवारी (14) बैठक बोलाविण्यात आली होती. सदर बैठक अचानक रद्द करण्यात आल्याने संतप्त बाधितांनी ओएनजीसीच्या प्रवेशद्वारावरच मच्छिमार कृती समितीच्या नेतृत्वाखाली ओएनजीसी आणि तहसीलदारांचा निषेध करून साखळी उपोषण सुरू केले आहे.

उरणच्या ओएनजीसी प्रकल्पातून शुक्रवार, 8 सप्टेंबर रोजी पहाटेच्या वेळेस तेलगळती झाली होती. या तेलगळतीमुळे शेतकरी, मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकरी, मच्छिमारांना नुकसान भरपाई देण्यासाठी तहसीलदारांनी पंचनामेही केले आहेत. त्यानंतर या नुकसानीसंदर्भात चर्चा करण्यासाठी ओएनजीसी प्रशासनाबरोबर गुरुवारी (14) रोजी बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र, अचानक गुरुवारी होणारी बैठक रद्द करण्यात आली असल्याचा निरोप तहसीलदारांनी पाठविला. त्यामुळे शेतकरी व मच्छिमारांनी संतप्त होऊन फसवणूक करीत असल्याचा भावना नुकसानग्रस्तांमध्ये पसरली आहे. त्यामुळेच गुरुवारी ओएनजीसीच्या प्रवेशद्वारावरच जमलेल्या आणि संतप्त झालेल्या नुकसानग्रस्तांनी पीरवाडी मच्छिमार कृती समितीच्या नेतृत्वाखाली ओएनजीसी आणि तहसीलदारांचा निषेध करीत साखळी उपोषण सुरू केले असल्याची माहिती समितीचे नेते काका पाटील यांनी दिली.

या साखळी उपोषणात उरण पंचायत समितीचे माजी सभापती ॲड. सागर कडू, वैभव कडू, जनाधर थळी, संतोष कडू, स्वप्निल घरत, आशिष काठे, भुपेश कडू आणि महिलांही सहभागी झालेल्या आहेत. दरम्यान, अचानक काम निघाल्याने बोलविलेली बैठक रद्द करण्यात आली, परंतु ती लवकरच घेण्याचे आश्वासन तहसीलदार उद्धव कदम यांनी दिले. यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. जोपर्यंत बैठक बोलावून न्याय मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे.

Exit mobile version