महाप्रितच्या माध्यमातून रोजगाराची साखळी- मुख्यमंत्री

| मुंबई | प्रतिनिधी |

महाप्रितच्या माध्यमातून रोजगार निर्मितीची साखळी निर्माण होण्यास मदत होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला तर महाप्रितच्या माध्यमातून देशात महाराष्ट्र राज्य प्रगतिपथावर होईल, असा विश्‍वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित अर्थात महाप्रितच्या हरित निधी गुंतवणूकदार बैठकीत उभयता बोलत होते. महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संबंधित अधिकार्‍यांनी विभागनिहाय प्रत्येक प्रकल्पाची सद्यस्थिती व हे प्रकल्प पूर्ण करण्यासाठीचे नियोजन याबाबतचा कालबध्द कार्यक्रम हाती घेतला आहे. महाप्रितने ग्रीन फंड इन्व्हेस्टर मिट – 2022 आयोजित केली. यामध्ये विकासक व गुंतवणुक संस्था यांना एकाच व्यासपीठावर आणून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची साखळी निर्माण करण्याचा संकल्प महाप्रितचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी केला आहे व तो संकल्प लवकरच पूर्ण होईल, याची खात्री असल्याचे व या कार्यक्रमामुळे मागासवर्गीय समाजाला खर्‍या अर्थाने न्याय मिळेल असे सांगितले.

या सर्व व्हर्टिकल अंतर्गत वेगवेगळे प्रकल्प हाती घेऊन व अंमलबजावणी करून राज्याच्या मागासवर्ग व दुर्बल घटकांना स्वयंरोजगार व रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहेत असे सांगत मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाप्रित हरितनिधी गुंतवणूक बैठकीला शुभेच्छा दिल्या.

25,361 कोटींचा सामंजस्य करार
महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादितने मुंबईत आयोजिलेल्या महाप्रित हरितनिधी गुंतवणूक बैठकीत विविध 22 प्रकल्पांसाठी तब्बल 25 हजार 361 कोटी रूपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन, इरेडा, ग्रो बेटर ऍग्री ओव्हरसीज, इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी यांच्यासह अनेक नामवंत कंपन्यांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या प्रकल्पांमुळे नागपूर महानगरपालिका आणि महाप्रित यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत पात्र स्थानिक उद्योजकांना उद्योग सुरू करण्यास मदत होऊन समाजातील दुर्बल घटकांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. महाप्रितच्या माध्यमातून रोजगार निर्मितीची साखळी निर्माण होण्यास मदत होणार.

एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
Exit mobile version