| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल येथील पेशवेकालीन वडाळे सरोवर परिसरात भटक्या कुत्र्यांना उचलण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या निषेधार्थ विविध सामाजिक संस्थांच्या वतीने रविवार, दि. 18 जानेवारी रोजी साखळी आंदोलन करण्यात आले. ‘रस्ते सर्वांसाठी आहेत, भटक्या कुत्र्यांसाठीही आहेत’ असा संदेश देत आंदोलनकर्त्यांनी भटक्या प्राण्यांच्या हक्कांसाठी आपली भूमिका ठामपणे मांडली.
या आंदोलनात प्राणीप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत शांततामय मार्गाने निषेध व्यक्त केला. भटक्या कुत्र्यांना हटविण्याऐवजी त्यांचे लसीकरण, निर्बिजीकरण आणि पुनर्वसन करण्यावर भर देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. वडाळे सरोवर परिसरात साखळी स्वरूपात उभे राहून आंदोलनकर्त्यांनी प्राणीमित्र धोरण राबविण्याचे आवाहन प्रशासनाला केले. या आंदोलनामुळे परिसरात सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश पोहोचल्याचे नागरिकांनी सांगितले.
भटक्या कुत्र्यांच्या समर्थनार्थ साखळी आंदोलन
