| पनवेल | प्रतिनिधी |
चेन स्नॅचिंग करणाऱ्या मोटारसायकलस्वार लुटारुंनी पनवेल आणि कामोठे परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला असून, या लुटारुंनी अवघ्या दोन दिवसांत तीन महिलांच्या अंगावरील तब्बल 11 लाख 20 हजार रुपयांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने व मंगळसूत्रे हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. छाया महाडकर या पतीसह करंजाडे सेक्टर-3 येथील सदाबहार नर्सरीजवळ फेरफटका मारत असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोघा लुटारुंनी त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा केला. त्यानंतर या लुटारुंनी छाया महाडकर यांच्या गळ्यातील 20 ग्रॅम वजनाचे, 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून पलायन केले. यावेळी झालेल्या झटापटीत छाया महाडकर यांना दुखापत झाली आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्या घटनेत पनवेल शहरातील गोविंद हॉटेलसमोर लता गणेश गोडेकर या पायी चालत जात असताना काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून आलेल्या दोघा लुटारुंनी त्यांच्या गळ्यातील सुमारे 7 तोळे वजनाचे, 7 लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेले. तर कामोठे येथे सुधा राजन गुप्ता या पतीसमवेत रिक्षाने खारघरकडे जात असताना मॅकडोनाल्ड्ससमोर मोटारसायकलवरून आलेल्या दोघा लुटारूंनी रिक्षाशेजारी येत सुधा गुप्ता यांच्या गळ्यातील अंदाजे 30 ग्रॅम वजनाचे, डायमंड व काळे मणी असलेले सुमारे 3 लाख रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. या घटनेची नोंद कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.







