‘नॅक’च्या अध्यक्षपदी डॉ. भूषण पटवर्धन यांची निवड

| पुणे । वृत्तसंस्था ।
राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेच्या (नॅक) कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी डॉ. भूषण पटवर्धन यांची निवड करण्यात आली. दीर्घकाळानंतर नॅकच्या अध्यक्षपदी डॉ. पटवर्धन यांच्या रूपाने मराठी व्यक्तीची निवड झाली आहे. प्रा. जगदेशकुमार यांची विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नॅकचे अध्यक्षपद रिक्त होते. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाकडून डॉ. पटवर्धन यांची नॅकच्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून 1994 मध्ये नॅकची स्थापना करण्यात आली. डॉ. अरुण निगवेकर नॅकचे पहिले अध्यक्ष होते. देशभरातील महाविद्यालयांचे गुणवत्तेसाठी मूल्यांकन करण्याचे काम नॅककडून करण्यात येते.

डॉ. पटवर्धन सध्या आयुष मंत्रालयात राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र विभागात सुप्रतिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांनी यूजीसीचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे. बोगस संशोधनपत्रिकांना चाप लावण्यासाठी यूजीसी केअर यादी, महाविद्यालयांतील संशोधन क्षमता वृद्धीसाठी स्ट्राईड योजना, मानव्यता आणि समाजशास्त्रात संशोधनाला प्रोत्साहनासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

Exit mobile version