महिला शिक्षिकेच्या बदलीसाठी मागितली दीड लाखाची लाच
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेच्या महिला शिक्षिकेच्या बदलीसाठी दीड लाख रुपयांची लाच घेणे जिल्हा परिषद अध्यक्षांच्या स्वीय सचिवाला महागात पडले. रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (दि.23) सायंकाळी एका खासगी हॉटेलमध्ये लाच घेताना त्याला रंगेहाथ पकडले. या कारवाईने जिल्हा परिषदेच्या पारदर्शक कारभाराबाबत प्रश्न उपस्थित केला जात असून, या घटनेनंतर रायगड जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे. या कारवाईने टेबलावर आणि टेबलाखालून अर्थपूर्ण कार्यवाही करणाऱ्या वरिष्ठांचा वरदहस्त असणाऱ्या छुप्या रूस्तमांना दणका मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश प्रकाश भस्मे (46) असे या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. रायगड जिल्ह्यातील उरण येथील तो रहिवासी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागात सहाय्यक लेखाधिकारी या पदावर कार्यरत आहे. गेल्या काही महिन्यांपासून तो जिल्हा परिषदेेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्याकडे स्वीय सचिव म्हणून काम करीत आहे. तक्रारदार यांची पत्नी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षिका आहेत. त्यांच्या बदलीसाठी अर्ज करण्यात आला होता. तक्रारदार यांच्या पत्नीची बदली करून देण्यासाठी योगेश भस्मे यांनी दीड लाख रुपयांची लाच मागितली होती. अखेर तक्रारदाराने रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली. तक्रारीचे गांभीर्य ओळखून लाचलुचपत प्रतिबंधक रायगडच्या उपअधीक्षक सरिता भोसले यांनी कारवाई सुरु केली. लाच मागितल्याची पडताळणी केल्यावर पथक तयार करण्यात आले. उपअधीक्षक सरिता भोसले, पोलीस निरीक्षक निशांत धनावडे, पोलीस उपनिरीक्षक अरुण करकरे, पोलीस हवालदार परम ठाकूर, नवदीप नांदगावकर आदीच्या पथकाने बुधवारी (दि.23)सायंकाळी सापळा रचला. अलिबागमधील एका हॉटेलमध्ये दीड लाख रुपयांची लाच घेताना योगेश भस्मे याला रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली आहे. या कारवाईनंतर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामकाजातील पारदर्शकतेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.
उपअधीक्षकांकडून आवाहन
शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच अन्य एजंटद्वारे लाचेची मागणी करणाऱ्यांविरोधात रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात यावी. कोणी आढळून आल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधीक्षक सरिता भोसले यांनी केले.
लाच नेमकी कोणासाठी ?
रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांचे स्वीय सचिव योगेश भस्मे यांना दीड लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. एका महिला शिक्षिकेच्या बदलीसाठी ही लाच मागितली होती. परंतु, ही लाच नक्की कोणासाठी मागितली, असा प्रश्न जनतेकडून उपस्थित केला जात आहे. यामागील खरा सूत्रधार कोण, असा सवाल चर्चेतून निर्माण झाला आहे.
‘ती' चूक करणारा हाच स्वीय सचिव?
रायगड जिल्हा परिषदेच्या कामकाजामध्ये प्रशासकीय राजवट असताना कोणताही हस्तक्षेप होताना दिसला नाही. परंतु, लोकप्रतिनिधींनी सूत्रे हातात घेतली आणि जिल्हा परिषदेमध्ये सारे आलबेल सुरु झाल्याचे चित्र आहे. पत्रकारांना माहिती देण्यासाठी मनाई करण्याचे आदेशदेखील काढण्यात आले. या निर्णयावर टीकेची झोड उठल्यानंतर पत्रकारांना माहिती देण्यासाठीची कवाडे जिल्हा परिषद अध्यक्षांनी खुली केली. पण, ते करताना माझ्या स्वीय सचिवांकडून ही चूक झाल्याची कबुली वाट वाकडी करीत जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिली होती. ही चूक करणारे स्वीय सचिव हेच महाशय असणार, अशी चर्चा जिल्हा परिषदेच्या प्रांगणात सुरु होती.
लाचखोराच्या दिमतीला कर्मचाऱ्यांचा तांडा
लाचलुचपत विभागाने सापळा रचून रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांच्या स्वीय सचिव म्हणून कार्यरत असणाऱ्या योगेश भस्मेला लाच घेताना अटक केली. त्याला एका हॉटेलमधून ताब्यात घेत जिल्हा परिषदेमधील अध्यक्षांच्या कार्यालयात आणले होते. त्यानंतर त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पिंपळभाट येथील कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आले. त्याठिकाणी चौकशीसाठी आणल्यानंतर रायगड जिल्हा परिषदेमधील कर्मचाऱ्यांचा तांडा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाबाहेर त्याच्या दिमतीला उभा असलेला दिसला.
भस्मेची ढवळाढवळ
शिक्षण विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या बदलीसाठी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या स्वीय सचिवांची गरज का भासली, असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. अर्थ विभागात काम करणारा भस्मे अध्यक्षांचा पीए झाल्यानंतर शिक्षण विभागात ढवळाढवळ करू लागल्याचे हे प्रत्यक्षदर्शी उदाहरण आहे. बदली करण्याचे अधिकार हे शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना असणे साहजिक आहे. परंतु, या बदल्यांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षांचा स्वीय सचिव असणाऱ्या भस्मेची भूमिका संशयास्पद आहे. या भस्मेने मागून स्वीकारलेली लाच नक्की कोणाच्या सांगण्यावरून घेतली, हे तपासामध्ये सिद्ध होईल.
सापळ्यामागे खूप काही
पारदर्शक कारभाराचा डंका पिटणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा रायगड जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आहे. जिल्हा परिषदेची सत्ता तीन पक्षांच्या हाती असली तरी भाजपचे पदाधिकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आपला वाचक ठेवून आहेत. विकासात्मक कामांचा मागोवा घेताना कामांचे प्रस्ताव आणि बिलांच्या फाईल अध्यक्षांच्या टेबलावरून खाली येतात, अशी चर्चा जिल्हा परिषदेमध्ये आहे. कामे वाटप आणि बिलांच्या फाईल अडकवल्याच्या रागातूनच ही कारवाई झाली असून, या सापळ्यामागे खूप काही दडले असल्याचे पोलीस तपासात उघड होण्याची शक्यता आहे.
