उरणमध्ये चक्रीचा जुगार जोरात

पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी
। उरण । वार्ताहर ।
उरण परिसरात सध्या क्रिकेट मॅच व यात्रा-पालखी सोहळा हंगाम सुरू आहे. त्यामध्ये चक्रीचा जुगार जोरात सुरू असतो. दिवसाला एक ते दोन लाखांची उलाढाल होत असल्याची चर्चा आहे. तरी या चक्री जुगारावर पोलिसांनी कारवाई करून ती बंद करण्याची मागणी जनतेकडून जोर धरू लागली आहे.
कोरोनाच्या काळात गेली दोन वर्षे बंद असलेले सर्व आता पूर्वपदावर येऊ लागले आहेत. त्यामुळे सर्वांच्या अंगात उत्साह संचारला आहे. यामुळे सदर सण साजरे करताना गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रामुख्याने क्रिकेट मॅच तालुक्यात अनेक ठिकाणी सुरू आहेत. त्यामध्ये रात्रपाळीत क्रिकेटचे सामने होत आहेत. तसेच आता यात्रा-पालखी सोहळा मोठ्या उत्साहात तालुक्यात साजरे होणार आहेत.
क्रिकेट सामने व यात्रा पालखीच्या ठिकाणी चक्री नावाचा जुगाराचा अड्डा सुरू असतो. त्यामध्ये चक्रीवर एक आकडा लागत असतो; परंतु त्यावर आकडे लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचे चित्र पाहावयास मिळते. परंतु, त्यातील एका आकड्यालाच ठराविक रक्कम मिळते व इतरांची जाते. या चक्री जुगारामुळे अनेक कुटुंबांत कलह निर्माण होऊन ते कुटुंब उद्ध्वस्त होण्यापर्यंत मजल गेली आहे. तरी अशा चक्री जुगारावर पोलिसांनी ठोस कारवाई करण्याची मागणी महिला वर्गाकडून जोर धरू लागली आहे.

Exit mobile version